MS Dhoni Fitness Video : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सतत चर्चेत असतो. धोनीचे व्हिडीओ आणि फोटो नेहमी व्हायरल होत असतात. आता धोनीचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.
खरं तर एमएस धोनीने २०२० मध्येच त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केला होता. पण तो अजूनही इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळताना दिसतो. आता आयपीएल २०२५ जवळ येत आहे. आयपीएलचा आगामी सीझन २१ मार्चपासून सुरू होणार आहे.
अशा स्थितीत धोनीने आगामी आयपीएलची तयारी सुरू केली आहे. आयपीएलला आणखी दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. अशा स्थितीत त्याने सरावाला सुरुवात केली आहे. या सरावाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. खरं तर वयाच्या ४३ व्या वर्षीही धोनीची फिटनेस तरुणांना लाजवेल अशी आहे.
एमएस धोनी सीएसके अकादमीमध्ये नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. धोनीने या आयपीएलसाठी अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार आहे. त्याला सीएसकेने ४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झाला असेल, तर अशा खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत ठेवले जाणार आहे.
दरम्यान, धोनीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्याचे मजबूत बायसेप्सचे दिसत आहेत. वयाच्या ४३ व्या वर्षीही 'थला'च्या मजबूत फिटनेसबद्दल चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
धोनीला आयपीएल २०२५ पूर्वी सर्व तयारी पूर्ण करायची आहे. सीएसके अकादमीमध्ये गेल्या एक आठवड्यापासून तो सतत नेटमध्ये घाम गाळत आहे. धोनी आयपीएल २०२४ मध्ये कधी आठव्या तर कधी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता.
अशा स्थितीत तो पुढचे आयपीएल खेळणार नाही, असा अंदाज लावला जात होता. पण धोनीने हे अंदाज पूर्णपणे चुकीचे ठरवले आणि आगामी आयपीएल हंगामाची तयारी सुरू केली. धोनी चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो. त्याला गुडघ्यांचा त्रास आहे, त्यामुळे तो केवळ शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला येतो, या षटकात तो चौकार-षटकारांच्या माध्यमातून धावा वसूल करतो. गेल्या मोसमात धोनीने १४ सामन्यांत २२० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळताना १६१ धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या