आयपीएल २०२५ ची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्याआधी आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. हा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पण या सगळ्यापासून दूर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज एमएस धोनी आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवत आहे. एमएस धोनी त्याच्या कुटुंबासह थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यांचा मजा करतानाचे फोटो समोर आले आहेत. धोनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटच्या गजबजाटापासून दूर आहे. तो थायलंडमधील फुकेतमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवत आहे. धोनी आयपीएल ऑक्शनपूर्वी कुटुंबासोबत निवांत क्षण घालवत आहे. त्याची मुलगी झिवा हिचा इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये धोनी काळा स्लीव्हलेस टी-शर्ट घालून समुद्राच्या पाण्यात उभा आहे. धोनीच्या चेहऱ्यावरील शांतता आणि समाधान स्पष्टपणे दिसत आहे. त्याची पत्नी साक्षी गुलाबी स्विमसूटमध्ये किनाऱ्यावर उभी आहे, ती कदाचित पाण्यात उतरण्याचा विचार करत आहे. आयपीएल २०२५ पूर्वी फ्रेश होण्याची ही छोटी सुट्टी धोनीसाठी चांगली संधी आहे.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी धोनीच्या भविष्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. हा मोसम आपल्या आवडत्या थाला शेवटचा हंगाम असू शकतो, अशी भीती अनेक चाहत्यांना वाटत होती.
पण या चर्चेला पूर्णविराम देत ३१ ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपर किंग्जने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करण्याची घोषणा केली. ही बाब चाहत्यांना दिलासा देणारी होती. आता हे निश्चित आहे की आयपीएल २०२५ मध्ये धोनी पुन्हा पिवळ्या जर्सीत 'हेलिकॉप्टर शॉट' मारताना दिसणार आहे.