Sachin Tendulkar Retirement Day Story : महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले. त्यामुळे चाहते त्याला क्रिकेटचा देव असेही म्हणतात. नुकतेच मुंबईत बीसीसीआयकडून वार्षिक नमन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सचिनला बीसीसीआयच्या सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या अवॉर्ड नाईटमध्ये सचिनने हा प्रतिष्ठेचा सन्मान स्वीकारला तेव्हा त्याला त्याच्या निवृत्तीचे भावनिक क्षण आठवले. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि संपूर्ण भारतीय संघाने त्याच्यासाठी निरोपाची खास योजना कशी आखली होती हे त्याने सांगितले.
२०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्याची आठवण करून देताना सचिन तेंडुलकर म्हणाला, "मी त्या क्षणांचे शब्दात वर्णन करू शकत नाही. जेव्हा माझा शेवटचा डाव संपला तेव्हा संपूर्ण संघाला माझ्यासाठी काहीतरी खास करायचे होते."
अशा स्थितीत धोनी माझ्याजवळ आला आणि म्हणाला, “पाजी, तुम्ही थोडा वेळ दूर राहा, आम्ही काहीतरी प्लान करत आहोत.” यानंतर भारतीय संघाने सचिनला गार्ड ऑफ ऑनर दिले, हा क्षण क्रिकेट चाहत्यांसाठी भावनिक होता.
सचिन म्हणाला, "जेव्हा मला तो निरोप देण्यात आला, तेव्हा मला जाणवले की मी पुन्हा कधीही भारतीय संघासाठी खेळू शकणार नाही. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक होता."
सचिन तेंडुलकरने १४ ते १६ नोव्हेंबर २०१३ दरम्यान त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला, जो वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी सामना होता. हा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला होता.
सचिनने आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ६२.७१ च्या स्ट्राईक रेटने ११८ चेंडूत ७४ धावा केल्या होत्या. सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या. याशिवाय त्याने ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत. सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतके झळकावली आहेत.
संबंधित बातम्या