भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या चर्चेत आहे. धोनीने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल भरभरून सांगितले आहे.
विराट कोहलीने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर विराट कोहली २०१५ पर्यंत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत राहिला. त्यानंतर माहीच्या जागी विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार झाला. महेंद्रसिंग धोनीने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ आणि एकदिवसीय विश्वचषक २०१९ खेळला. मात्र, आता माहीने विराट कोहलीसोबत फलंदाजीचा अनुभव शेअर केला आहे.
धोनी आणि कोहलीने अनेक संस्मरणीय क्षण शेअर केले आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावर अनेक शानदार भागीदारी केल्या आहेत.
धोनीने अलीकडेच हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या नात्याचा खुलासा केला. विराटसोबतच्या नात्याबद्दल बोलताना धोनी म्हणाला की, जेव्हाही ते दोघे भेटतात तेव्हा ते एकमेकांशी भरपूर गप्पा मारतात.
महेंद्रसिंह धोनी त्याच्या आणि कोहलीच्या नात्याबद्दल म्हणाला, 'आम्ही भारतासाठी दीर्घकाळ खेळलो आहोत. जागतिक क्रिकेटचा विचार करता तो (कोहली) सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मधल्या षटकांमध्ये त्याच्यासोबत खूप फलंदाजी करताना खूप मजा यायची कारण आम्हाला खेळात खूप २ आणि ३ धावा धावून मिळवायला लागायच्या, त्यामुळे नेहमीच मजा यायची.
तसेच, धोनी पुढे म्हणाला, असे नाही की आम्ही अनेकदा भेटतो, पण जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळते तेव्हा आम्ही खूप वेळ गप्पा मारतो. हे असे आमचे नाते आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रन मशिन विराट कोहलीने अखेर T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने आता त्याच्या कारकिर्दीत आयसीसी एकदिवसीय विश्वचषक, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला आहे.
जूनमध्ये वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये त्याने ७६ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती. त्या संपूर्ण विश्वचषकात विराटने चांगली फलंदाजी केली नाही, पण त्याने फायनलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली.
एमएस धोनी क्रिकेटच्या मैदानावर आयपीएल २०२४ मध्ये दिसला होता होता. आयपीएल २०२४ मध्ये, त्याने २२० च्या तुफानी स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ११ डावात १६१ धावा केल्या. संपूर्ण मोसमात त्याने १४ चौकार आणि १३ षटकार मारले. तथापि, एमएस धोनी आयपीएल २०२५ मध्ये सहभागी होणार की नाही याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.