ms dhoni viral video : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ४ वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो फक्त आयपीएलमध्येच खेळताना दिसतो, पण आजही तो देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटर आहे.
अशातच आता धोनीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावरून त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला फॅन धोनीला पाहताच भावूक झाली. तिने धोनीच्या पायाला स्पर्श करून त्याला मिठी मारली आणि त्याला एक पुष्पगुच्छही दिला. यानंतर ती महिला भारतीय जर्सीवर त्याचा ऑटोग्राफ घेते.
यावेळी धोनी इतर चाहत्यांनाही ऑटोग्राफ देतो आणि त्यांच्यासोबत फोटो काढतो. हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील आहे.
सोबतच, चेन्नई सुपर किंगच्या फॅन पेजवरून आणखी एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये धोनी एका कुत्र्यासोबत दिसत आहे. धोनी या कुत्र्याला आपल्या कडेवर घेऊन जात आहे. हा फोटो शेअर करताना लिहिले होते की, हा इंटरनेटवरील सर्वात क्यूट फोटो आहे.
धोनी आता IPL २०२४ मध्ये दिसणार आहे. आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवल्यानंतर धोनी म्हणाला होता की त्याला चाहत्यांसाठी आणखी एक सीझन खेळायचा आहे, परंतु त्याच्यासाठी हे खूप कठीण असेल.
IPL २०२३ नंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर तो जिममध्ये दिसला, मात्र त्याने क्रिकेटचा सराव केलेला नाही. धोनी पुढच्या आयपीएलमदध्ये खेळणार की नाही? याचा निर्णय यावर्षी डिसेंबर महिन्यात घ्यावा लागणार आहे.
१९ डिसेंबर रोजी आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. याआधी धोनीला त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा निर्णय घ्यावा लागेल.