लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज (२५ मे) ७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील ५८ जागांसाठी मतदान होत आहे. याआधी ५ टप्प्यात ४२९ जागांवर मतदान झाले. तर शेवटच्या ५६ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही आज रांची येथे मतदान केले. धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला. त्यानंतर धोनी रांचीला पोहोचला होता.
धोनीला मतदानाचा हक्क बजावताना पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी मतदान केंद्रावर झाली होती. धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो आपल्या देशाप्रती कर्तव्यनिष्ठ आहे. रांचीच्या लोकांनी धोनीचे उत्साहात आणि आनंदाने स्वागत केले.
दरम्यान, गेल्या वर्षी धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे तो चालू आयपीएल हंगामात मूठभर चेंडू शिल्लक असताना फलंदाजीसाठी उतरला. धोनीने यंदा १४ सामन्यांत ५३.६७ च्या सरासरीने आणि २२०.५५ च्या स्ट्राईक रेटने १६१ धावा केल्या.
धोनीचे वनडे करिअर- धोनीने ३५० दिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत. त्याने १० हजार ७७३ धावा ठोकल्या आहेत. यात १० शतके आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, धोनी यादरम्यान ८२६ चौकार तर २२९ षटकारही ठोकले आहेत. सोबतच विकेटकीपर म्हणून त्याने ३२१ झेल आणि १२३ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
धोनीचे टेस्ट क्रिकेट- धोनी ९० कसोटी सामने खेळले आहेत, त्यात त्याने ४८७६ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या २२४ आहे. कसोटीत धोनीने ६ शतके तर ३३ अर्धशतके ठोकली आहेत. तसेच, विकेटकीपर म्हणून २५६ कॅच आणि ३८ यष्टीचीत केले आहेत.
धोनीचे टी-20 क्रिकेट करिअर- धोनीने ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने १६१७ धावा केल्या आहेत, त्याची सर्वोच्च धावसंख्या ५६ इतकी आहे. या दरम्यान माहीने ११६ चौकार आणि ५२ षटकार ठोकले आहेत. तर विकेटकिपींगमध्ये ५७ झेल आणि ३४ यष्टिचीत केले आहेत.