आयपीएल २०२४ चा फिव्हर आज शुक्रवारपासून (२२ मार्च) सुरू होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज आमनेसामने असतील. पण त्याआधी सीएसकेने चाहत्यांना एक जबर धक्का दिला. यामुळे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.
वास्तविक, या मोसमाच्या सलामीच्या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. आता ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज सोशल मीडियावर ही घोषणा केली. धोनी आता स्पेशालिस्ट यष्टिरक्षक फलंदाज म्हणून मैदानात उतरणार आहे.
दरम्यान, जेव्हा एमएस धोनीने कर्णधारपद सोडल्याची बातमी संघातील खेळाडूंना दिली तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये काय वातावरण होते हे आता समोर आले आहे. जेव्हा 'थला'ने सीझन सुरू होण्यापूर्वी आपण कर्णधारपद सोडत असल्याचे सांगितले, तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी ड्रेसिंग रूमची संपूर्ण परिस्थिती सांगितली आहे.
आता ऋतुराज गायकवाड आपला कर्णधार असेल, अशी घोषणा धोनीने करताच ड्रेसिंग रुममधील खेळाडूंच्या भावना उफाळून आल्या. ड्रेसिंग रूममधील सर्वांच्या डोळ्यात पाणी होते. गेल्या वेळी जेव्हा धोनीने कर्णधारपद सोडल्याची बातमी दिली होती तेव्हा आम्ही नेतृत्व बदलासाठी तयार नव्हतो. पण आता, ऋतुराज गायकवाड याचे सर्वांनी अभिनंदन केले. तो काही जास्त बोलणाऱ्यांमध्ये नाही, पण आपल्या संघाला योग्य दिशेने पुढे नेण्याचे गुण त्याच्यात आहे".
विशेष म्हणजे, एमएस धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वी त्याने रवींद्र जडेजाकडे सीएसकेची कमान सोपवली होती, पण या निर्णयामुळे संघावर उलटा परिणाम झाला. मोसमाच्या मध्यावर धोनीला पुन्हा कर्णधारपद स्वीकारावे लागले. मात्र, यावेळची स्टोरी वेगळी असेल, असा विश्वास प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी व्यक्त केला.
काही वर्षांपूर्वीपर्यंत, महेंद्रसिंग धोनी नेतृत्वाच्या भूमिकेपासून दूर जाईल यासाठी आम्ही तयार नव्हतो. दोन वर्षांपूर्वी त्याने हा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. यावेळीही धोनी आता कर्णधार असणार नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे, पण तुम्हाला बीज पेरावी लागतील. त्यामुळे आम्ही कठोर परिश्रम केले आणि यावेळी कोणत्याही चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली."