भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानावरील त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला 'कॅप्टन कूल' म्हटले जाते, पण धोनी अनेकदा संतापतो, त्यालाही राग प्रचंड राग येतो, हे त्याच्या जवळच्या अनेकांनी सांगितले आहे.
आता अशातच टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभज सिंग यानेही एक किस्सा सांगितला आहे. धोनीने रागात टीव्ही फोडल्याचेही भज्जीने सांगितले. हरभजन काही वर्ष चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे.
दरम्यान, धोनीचा हा किस्सा १८ मे २०२४ रोजी झालेल्या CSK विरुद्ध RCB सामन्यातला आहे. साखळी टप्प्यातील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना होता आणि विशेषत: प्लेऑफमध्ये जाण्यसाठी दोन्ही संघांना तो सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते. पण चेन्नईने तो सामना २७ धावांच्या मोठ्या फरकाने गमावला.
सामान्यतः सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करतात, परंतु त्या सामन्यानंतर विरोधी संघातील खेळाडूंशी धोनी हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रूममध्ये परतला.
एका वृत्तानुसार, माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने सांगितले की, आरसीबीच्या विजयानंतर एमएस धोनीचा राग शिगेला पोहोचला होता. वास्तविक, रागामुळे धोनीने बेंगळुरूच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच मैदान सोडले होते. धोनीने रागाच्या भरात टीव्ही तोडल्याचा दावाही हरभजनने केला.
त्या 'करा किंवा मरोच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम खेळताना २१८ धावा केल्या होत्या. तर प्लेऑफची समीकरणे अशी होती, की, चेन्नईचा पराभव झाला तरी तो १८ धावांपेक्षा जास्त फरकाने नसावा.
हा सामना जिंकण्यासाठी CSK ला शेवटच्या षटकात ३५ धावांची गरज होती, पण त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी फक्त १६ धावांची गरज होती. धोनी स्ट्राईकवर होता, तर यश दयाला गोलंदाजीला होता. धोनी पहिल्याच चेंडूवर षटकार पण तो दुसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. अशा स्थितीत सीएसकेने सामना गमावला. चेन्नईला शेवटच्या षटकात केवळ ७ धावा करता आल्या. प्लेऑफमध्ये स्थान मिळवू न शकल्याने धोनी प्रचंड संतापला, तसेच, आरसीबीच्या खेळाडूंनी मैदानाव जणू काय फायनल जिंकल्यासारखा जल्लोष केला होता. या नादात त्यांनी मैदानावर प्रचंड वेळ घालवला, शेवटी धोनी वाट पाहून खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच निघून गेला.