भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ३ गडी बाद ८१ धावा आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मासह यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. वास्तविक, आतापर्यंत चेपॉकच्या मैदानावर गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे.
चेपॉकची विकेट दोन्ही संघांच्या गोलंदाजांसाठी स्वर्गच ठरत आहे. त्याचबरोबर या विकेटवर फलंदाज हतबल आणि असहाय दिसत आहेत. मात्र, सुरुवातीच्या धक्क्यांनंतरही भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे.
मात्र, आज (२० सप्टेंबर) चेन्नई कसोटीचा दुसरा दिवस गोलंदाजांच्या नावावर राहिला. चेपॉक कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून १७ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले, हा एक विक्रम आहे.
यापूर्वी २०२१ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीच्या चौथ्या दिवशी १५ विकेट पडल्या होत्या.
या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी १५ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये गेले होते. त्याच वेळी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चेपॉक येथे १९७९ मध्ये कसोटी खेळली गेली होती. त्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एकूण १५ फलंदाज बाद झाले. अशाप्रकारे आज चेपॉकमध्ये एका दिवसात सर्वाधिक फलंदाज बाद करण्याचा विक्रम झाला.
आज भारताच्या पहिल्या डावातील उर्वरित ४ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर बांगलादेशचे १० खेळाडू बाद झाले. त्याचवेळी दुसऱ्या डावात भारतीय संघाचे ३ फलंदाज बाद झाले आहेत. अशाप्रकारे चेपॉक कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे एकूण १७ फलंदाज बाद झाले.
दरम्यान, चेन्नई कसोटीबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद ८१ अशी आहे. भारतीय संघाची आघाडी ३०८ धावांवर पोहोचली आहे. भारताकडून ऋषभ पंत आणि शुभमन गिल नाबाद परतले होते.
त्याआधी दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला १४९ धावांवर गुंडाळले.
यानंतर दुसऱ्या डावातही रोहित शर्मा लवकर बाद झाला. रोहित शर्माने ५ धावा केल्यानंतर त्याची विकेट गमावली. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या जैस्वालने दमदार सुरुवात केली होती, मात्र यावेळी तो केवळ १० धावाच करू शकला. यावेळी गिलनेही चांगली सुरुवात केली आणि तो ३३ धावांवर नाबाद आहे. गिलला पंतची साथ मिळत आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ३०८ धावांची आघाडी घेतली होती.