भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना डर्बनमध्ये आज (१० डिसेंबर) खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यातील टी-20 सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
भारताचा दक्षिण आफ्रिकेत टी-20 चा रेकॉर्ड चांगला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी पाहिली, तर रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. पण रोहित यावेळी या मालिकेचा भाग नाही. विराट कोहली आणि रोहित शर्माला ब्रेक देण्यात आला आहे.
रोहित आणि विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत खेळणार नाहीत. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७ टी-20 सामन्यात ४२० धावा केल्या आहेत. त्याने आफ्रिकेविरुद्ध १ शतक आणि २ अर्धशतके झळकावली आहेत.
यानंतर सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाने १२ सामन्यात ३३९ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक झळकावले आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने १३ सामन्यात ३१८ धावा केल्या आहेत. शिखर धवन चौथ्या आणि दिनेश कार्तिक पाचव्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार पहिल्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वरने १२ सामन्यात १४ विकेट घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने १० सामन्यात ११ विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, सध्याच्या भारतीय संघात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. जर या दोघांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली तर श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग स्कोअर खूप पुढे नेऊ शकतात. हे चारही खेळाडू भारतासाठी महत्त्वाचे ठरतील.
गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना विकेट मिळू शकतात. सिराज हा अनुभवी गोलंदाज असून त्याने अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना आज १० डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर दुसरा सामना १२ डिसेंबरला होणार आहे. तिसरा T20 सामना १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल.
संबंधित बातम्या