चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा (२१ सप्टेंबर) खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवशी बांगलादेशच्या दुसऱ्या डावात अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने ११ चेंडूत १३ धावा केल्या.
अश्विनच्या गोलंदाजीवर केएल राहुलने त्याचा झेल घेतला. या छोट्या इनिंगमध्ये मुशफिकुर रहीमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो बांगलादेशसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने तमीम इक्बालला मागे टाकले आहे.
मुशफिकुर रहीमने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत खेळलेल्या ४६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ५१४ डावांमध्ये ३४.४७ च्या सरासरीने आणि ६५.२३ च्या स्ट्राईक रेटने १५२०५ धावा केल्या आहेत. या यादीत तमिम इक्बाल दुसऱ्या स्थानावर आहे. तमिमने ३८७ सामन्यांच्या ४४८ डावात १५१९२ धावा केल्या. या यादीत शाकिब अल हसन तिसऱ्या, महमुदुल्लाह चौथ्या आणि लिटन दास पाचव्या स्थानावर आहे.
१५२०५ धावा - मुशफिकुर रहीम (५१४ डाव)
१५१९२ धावा - तमिम इक्बाल (४४८ डाव)
१४७०१ धावा - शकिब अल हसन (४८९ डाव)
१०६९४ धावा - महमुदुल्लाह (४२३ डाव)
७१८३ धावा - लिटन दास (२५२ डाव)
भारताविरुद्धच्या पहिल्या डावातही मुशफिकर रहीमने चांगली फलंदाजी केली नाही. त्याने १४ चेंडूत केवळ ८ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने त्याला केएल राहुलकरवी झेलबाद केले.
रहिमच्या कसोटीतील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ९० सामन्यांच्या १६६ डावांत ३९.०१ च्या सरासरीने आणि ४८.२५ च्या स्ट्राइक रेटने ५८९२ धावा केल्या आहेत. त्याने २७ अर्धशतके आणि ११ शतके झळकावली आहेत. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे नाबाद २१९ धावा.