टी-20 विश्वचषक २०२४ नंतर राहुल द्रविडने भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले. त्यानंतर गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. पण आजपर्यंत त्याला पूर्ण सपोर्ट स्टाफ मिळू शकलेला नाही. सध्या श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाचा हंगामी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून साईराज बहुतुले जबाबदारी सांभाळत आहे.
मात्र आता लवकरच दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलला नवा गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची घोषणा केली जाऊ शकते.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, मॉर्ने मॉर्केल हा भारतीय संघाचा पुढील गोलंदाजी प्रशिक्षक असेल आणि तो बांगलादेश मालिकेदरम्यान संघात सामील होऊ शकतात.
अशा परिस्थितीत आशियाई खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजी अधिक प्रभावी असल्याने साईराज बहुतुले संघासोबत राहतो की त्याला फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका दिली जाऊ शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गौतम गंभीर आणि मॉर्ने मॉर्केल या जोडीने आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी एकत्र काम केले आहे. खरं तर, २०२२ मध्ये जेव्हा गौतम गंभीर LSG मध्ये मार्गदर्शक म्हणून सामील झाला तेव्हा मॉर्ने मॉर्केल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत होता. मॉर्केलला आंतरराष्ट्रीय संघांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे. त्याने नोव्हेंबर २०२३ पर्यंत पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते.
जोपर्यंत राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक होते, तोपर्यंत त्यांच्या सपोर्ट स्टाफमधील पारस म्हांबरे टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते. पारसला नोव्हेंबर २०२१ मध्ये ही जबाबदारी देण्यात आली होती आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी खूप चांगले काम केले. आता मॉर्केलच्या नावावर शिक्कामोर्तब करणे ही टीम इंडियाच्या भविष्यासाठी चांगली गोष्ट ठरते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.