Mongolia vs Singapore t20 match : टी-20 विश्वचषक आशियाई पात्रता फेरीत गुरुवारी (५ सप्टेंबर) मंगोलिया आणि सिंगापूर यांच्यात सामना झाला. हे क्वालिफायर सामने मलेशियामध्ये खेळले जात आहेत. या सामन्यात मंगोलियाच्या नावावर एक अतिशय लज्जास्पद विक्रम जमा झाला आहे.
वास्तविक, या सामन्यात मंगोलियन संघ प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १० धावांवर गारद झाला. यासह मंगोलिया आता आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात सर्वात कमी धावसंख्या बनवण्याच्या बाबतीत आयल ऑफ मॅनसह (Isle of Man) संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आला आहे.
मंगोलियाच्या ५ फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. तर ४ फलंदाजांनी १ तर २ फलंदाजांनी प्रत्येकी २ धावा केल्या. मंगोलियन फलंदाजांनी केवळ ८ धावा केल्या, उर्वरित दोन धावा वाइडमधून आल्या. अवघ्या ४ धावांत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता आणि कसा तरी मंगोलियन संघ १० धावांचा आकडा पार करू शकला.
सिंगापूरसमोर केवळ ११ धावांचे लक्ष्य होते, पण कर्णधार मनप्रीत सिंग डावाच्या पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा बळी ठरला. मात्र त्यानंतर विल्यम सिम्पसन आणि राओल शर्मा यांनी पुढच्या ४ चेंडूत आपल्या संघाला विजयाकडे नेले. सिम्पसनने चौकार मारून संघाचा विजय निश्चित केला.
मंगोलियन क्रिकेट संघाचा इतिहास खूप वाईट राहिला आहे. कारण आजपर्यंत हा संघ T20 क्रिकेटमध्ये ५० पेक्षा कमी धावांवर ७ वेळा ऑलआऊट झाला आहे. ३ वेळा या संघाला डावात २० धावाही करता आल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटच्या इतिहासात मंगोलियाकडे ४ पैकी तीन सर्वात निच्चांकी धावा करण्याचा विक्रम आहे. या वर्षी मे महिन्यात जपानविरुद्ध मंगोलिया १२ धावांत ऑलआऊट झाला होता. काही दिवसांपूर्वी म्हणजे ३१ ऑगस्ट रोजी हाँगकाँगने या संघाला १७ धावांवर सर्वबाद केले होते.