india vs sri lanka asia cup final : भारताने ८व्यांदा आशिया जिंकला आहे. फायनलमध्ये भारताने श्रीलंकचा १० विकेट्सने पराभव केला. आशिया कपच्या फायनलमध्ये मोहम्मद सिराजने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने अवघ्या २१ धावांत श्रीलंकेचे ६ फलंदाज बाद केले. या जोरावरच टीम इंडियाने श्रीलंकेला १५.२ षटकांत ५० धावांतच गारद केले. यानंतर धावांचा पाठलाग करताना अवघ्या ६.१ षटकात सामना जिंकला.
आशिया कपच्या फायनलमध्ये २९ वर्षीय सिराजने एकाच षटकात ४ विकेट घेतल्या. या सामन्यात त्याने ७ षटकांत २१ धावा देऊन ६ बळी घेतले. सिराजने ५ विकेट घेण्यासाठी केवळ १६ चेंडू घेतले. त्याने चमिंडा वासची बरोबरी केली.
२००३ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या चामिंडा वासनेही अशी कामगिरी केली होती. सामन्यानंतर मोहम्मद सिराज त्याच्या कामगिरीवर खूप खूश दिसत होता.
श्रीलंकेच्या डावानंतर समालोचक संजय मांजरकर यांच्याशी संवाद साधताना मोहम्मद सिराज म्हणाला की, आज त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जेवढं नशिबात असतं तेवढंच आपल्याला मिळते, असेही सिराज म्हणाला.
सिराजने पथुम निसांका (२), सदिरा समरविक्रमा (०), चरित असलंका (०), धनंजय डी सिल्वा (४), दासून शनाका (०) आणि कुसल मेंडिस (१७) यांची विकेट घेतली.
एका षटकात ४ बळी आणि सामन्यात एकूण ६ बळी घेण्याचा पराक्रम तू कसा साधलास? या प्रश्नाला उत्तर देताना सिराज म्हणाला, 'आज मला जास्त स्विंग मिळत होती. मी सहसा आऊटस्विंगवर नाही तर इस्विंगवर विकेट घेतो, पण आजचा दिवस वेगळा होता. ही अशी खेळपट्टी आहे जिथे विकेटच्या मागे धावले नाही तरच विकेट मिळेल. तेवढ्याच तसेच, लाईन आणि लेन्थवर मारा करत राहिल्यास यश नक्की मिळेल. मी तेच केले.'
श्रीलंकेविरुद्ध भारताच्या सर्व १० विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. मोहम्मद सिराजच्या २१ धावांत सहा बळींशिवाय हार्दिक पांड्यानेही तीन आणि जसप्रीत बुमराहलाही एक विकेट मिळाली. पावसामुळे सामना ३ वाजून ४० मिनिटाने म्हणजेच उशिराने सुरू झाला. या छोट्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारताने १० गडी राखून लक्ष्याचा पराभव करत विक्रमी आठव्यांदा आशिया कप विजेतेपद पटकावले.