Mohammed Siraj Reaction on Travis Head : ॲडलेड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (७ डिसेंबर) मोहम्मद सिराज याने ट्रॅव्हिस हेडला १४० धावांवर क्लीन बोल्ड केले, या विकेटनंतर मैदानावरील वातावरण चांगलेच ताणावाचे झाले होते.
खरे तर हेडची विकेट घेतल्यानंतर सिराजने आक्रमक सेलिब्रेशन केले आणि त्याला तंबूत जाण्याचा इशारा केला. यानंतर ट्रॅव्हिस हेडनेही प्रत्युत्तर देत काहीतरी पुटपुटले.
दरम्यान, यापूर्वी ट्रॅव्हिस हेड याने या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली होती, मात्र आता खुद्द मोहम्मद सिराज यानेही आपली बाजू मांडली आहे. सिराजने हेड खोट बोलत असल्याचे सांगितले आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ट्रॅव्हिस हेड म्हणाला, "मी त्याला सांगितले की त्याने चांगला चेंडू टाकला आहे. पण सिराजने माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढला. आता त्याला असेच वागायचे असेल तर का नाही."
ट्रॅव्हिस हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात १५७ धावांची मोठी आघाडी मिळाली.
ट्रॅव्हिस हेडच्या वक्तव्यावर मोहम्मद सिराज यानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि सांगितले की, "ट्रॅव्हिस हेडने वापरलेली शिवी चुकीची होती. तुम्ही टीव्हीवर पाहू शकता की मी त्याचा अपमान करण्यासाठी काहीही बोललो नाही. ते फक्त सेलिब्रेशन करण्याचा एक प्रकार होता."
हेड पत्रकार परिषदेत ते जे काही बोलला ते चुकीचे होते. हेड म्हणत आहे की त्याने ‘मला वेल बोल्ड म्हटले’, परंतु त्याने हे बोलल्याचा कोणताही पुरावा नाही.
सिराज पुढे म्हणाले की, मी सर्वांचा आदर करतो, मात्र ट्रॅव्हिस हेडने हा विषय ज्या पद्धतीने सर्वांसमोर मांडला ते आपल्याला आवडले नाही.
तसेच, या घटनेच्या वेळी स्टंप माईकमध्ये काहीही टिपले गेले नाही, त्यामुळे कोण खरे आणि कोण खोटे बोलत आहे हे सांगणे कठीण आहे. पण हेडने 'वेल बोल्ड' म्हटले नाही, हे व्हायरल व्हिडिओवरून स्पष्टपणे दिसत आहे.
मोहम्मद सिराजने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ४ फलंदाजांना बाद केले होते. ट्रॅव्हिस हेडची विकेट त्यापैकी सर्वात खास होती कारण त्याची १४० धावांची खेळी टीम इंडियाच्या हातून सामना काढून घेऊन गेली.