भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटी खेळली जात आहे. या सामन्याचा आज (७ डिसेंबर) दुसरा दिवस असून ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड बनवली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ट्रॅव्हिस हेड. हेडने जबरदस्त शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पहिल्या डावात ३०० च्या पुढे नेली, त्यामुळे कांगारू संघ मोठ्या आघाडीकडे वाटचाल करत आहे.
हेडने शानदार फलंदाजी करत १४१ चेंडूत १४० धावांची खेळी केली. त्याची विकेट मोहम्मद सिराजने घेतली. पण यादरम्यान सिराज आणि हेड यांच्यात राडा झाला. यामुळे मैदानावरील वातावरण चांगलेच तापले.
वास्तविक, ट्रॅव्हिस हेडने भारताच्या सर्वच गोलंदाजांची तुफान धुलाई केली. हेड ज्या षटकात बाद झाला त्या षटकात त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला होता. त्यामुळे सिराज चांगलाच संतापला होता, अशा स्थितीत त्याने हेडला यॉर्कर लेंथ चेंडू टाकला, त्यावर ट्रॅव्हिस हेड बीट झाला आणि त्याची दांडी उडाली. हेड बोल्ड होताच सिराजने जोरदार जल्लोष केला, त्याने हेडला पव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला, पण हेडला हे आवडले नाही. त्यानेही सिराजला वाईट शब्दात काहीतरी सुनावले.
यानंतर मैदानावरील दोन्ही पंचांनी सिराजला बोलावून समजावले यानंतर प्रकरण शांत झाले. बाद होण्यापूर्वी हेडने १४१ चेंडूंत १७ चौकार आणि ४ षटकारांसह १४० धावा केल्या.
दुसऱ्या दिवशी भारताला अडचणीत आणण्याचे श्रेय ट्रॅव्हिस हेडला जाते. तो फलंदाजीला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळाली नव्हती आणि सामन्यावर भारताचे नियंत्रण होते.
पण येथून हेडने आपल्या परिचित शैलीत फलंदाजी केली आणि नंतर भरपूर धावा केल्या. त्याने आधी आपले अर्धशतक ६३ चेंडूत पूर्ण केले आणि त्यानंतर दिवस-रात्र कसोटीत सर्वात जलद शतकाचा (१११ चेंडूत) विक्रम केला, जो यापूर्वीही त्याच्याच नावावर होता.
शतकानंतर हेड अधिक आक्रमक मूडमध्ये दिसला आणि मोकळेपणाने मोठे फटके खेळले. भारतीय गोलंदाजांकडे त्याच्या फलंदाजीला उत्तर नसल्याचे दिसत होते. मात्र, नवीन चेंडू येताच कर्णधार रोहित शर्माने आपल्या मुख्य वेगवान गोलंदाजांना दोन्ही बाजूंनी तैनात केले आणि त्यानंतर सिराजने उत्कृष्ट यॉर्कर मारून हे काम पूर्ण केले.
संबंधित बातम्या