India vs Australia : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (४ जानेवारी) अप्रतिम गोलंदाजी केली. सिराजच्या गोलंदाजीसमोर कांगारू फलंदाज झुंजताना दिसले. विशेष म्हणजे, सिराजने एकाच षटकात सॅम कॉन्स्टास आणि ट्रॅव्हिस हेड यांचे विकेट घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
आज सामन्याचा दुसरा दिवस असून ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात १८५ धावांवर गडगडला होता. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात हे वृत्त लिहिपर्यंत ४ बाद ९६ धावा केल्या होत्या.
भारताच्या पहिल्या डावाला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खूपच खराब झाली आणि भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिला. उस्मान ख्वाजाला २ धावांवर बाद केले.
आज दुसऱ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांना लवकर यश मिळाले. जसप्रीत बुमराहने मार्नस लॅबुशेनला (२) यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद केले. मैदानावरील अंपायरने लॅबुशेनला आऊट दिले नाही, त्यामुळे बुमराहने रिव्ह्यू घेतला कारण चेंडू स्पष्टपणे मार्नसच्या बॅटला लागला होता. त्यानंतर मोहम्मद सिराजने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले.
सिराजने प्रथम सॅम कॉन्स्टासला (२३) यशस्वी जैस्वालकडे गलीमध्ये झेलबाद केले. त्यानंतर धोकादायक फलंदाज ट्रॅव्हिस हेडलाही (४) बाद करून सर्वात मोठा धक्का दिला. दुसऱ्या स्लिपमध्ये केएल राहुलने हेडला झेलबाद केले.
सध्याच्या मालिकेतील ४ सामने पूर्ण झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडे २-१ अशी आघाडी आहे. आता पाचवी कसोटी खूप महत्त्वाची आहे. जर टीम इंडिया हा सामना हरला तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरू शकणार नाही.
पण हा सामना जिंकला तर आगामी कसोटी मालिकेत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला किमान १-० अशा फरकाने पराभूत करावे अशी भारतीय संघाला प्रार्थना करावी लागेल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गेल्या १० वर्षांपासून भारताकडेच आहे. भारताने ही मालिका सलग ४ वेळा जिंकली आहे.
संबंधित बातम्या