भारतीय क्रिकेट संघाचा घातक वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या ब्रेकवर आहे. शमी वनडे वर्ल्ड कप २०२३ पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. तो जखमी झाला आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. पण आता शमी तंदुरुस्त असून टीम इंडियात पुनरागमन करण्यास तयार आहे.
टीम इंडियामध्ये सामील होण्यासाठी शमी देशांतर्गत क्रिकेटचा मार्ग स्वीकारणार आहे. एका रिपोर्टनुसार तो लवकरच देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात करणार आहे. शमीप्रमाणेच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियात असतानादेखील स्वत:वर काम करण्यासाठी देशांतर्गत सामने खेळायचा.
टीम इंडियात पुनरागमन करण्याबाबत शमीने प्रतिक्रिया दिली आहे. शमी म्हणाला, 'मी टीम इंडियामध्ये कधी परतेन हे सांगणे कठीण आहे. यावर मी खूप मेहनत घेत आहे. पण आशा आहे की टीम इंडियाच्या आधी तुम्ही मला बंगालकडून खेळताना पाहाल. मी बंगालसाठी दोन-तीन सामने खेळायला येईन. यासाठी मी पूर्ण तयारीनिशी येईन.
शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा हिरो होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने एक विकेट घेतली होती. यापूर्वी त्याने न्यूझीलंडविरुद्ध ७ विकेट घेतल्या होत्या. श्रीलंकेविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात शमीने अवघ्या १८ धावांत ५ विकेट घेतल्या होत्या.
फेब्रुवारी २०२४ मध्ये शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली. यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये राहिला आणि पुनरागमनाची तयारी केली. शमी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंना देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याआधीही अनेक खेळाडूंवर टीका झाली आहे. काही खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात, पण देशांतर्गत सामने खेळत नाहीत.