India Vs Australia : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे उर्वरित दोन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) सोमवारी याबाबत माहिती दिली. बीसीसीआयनं शमीच्या फिटनेसबाबत अपडेट जारी केलं आहे.
बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार, 'शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय पथकानं शमीला बरं वाटावं म्हणून काम केलं आहे. टाचेच्या दुखण्यातून तो पूर्णपणे बरा झाला आहे. नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात शमीनं ४३ षटकं टाकली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो ९ सामने खेळला, तिथं त्यानं कसोटी सामन्यांच्या तयारीसाठी अतिरिक्त गोलंदाजी सत्रात भाग घेतला. मात्र, गोलंदाजीमुळं जॉइंटवर जास्त भार आल्यानं त्याच्या डाव्या गुडघ्याला थोडी सूज आली आहे. बऱ्याच कालावधीनंतर अधिक गोलंदाजी केल्यामुळं ही सूज अपेक्षित पातळीवर आहे.
'बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या म्हणण्यानुसार, शमीच्या गुडघ्याला नियमित गोलंदाजीच्या वर्कलोडशी जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ लागेल. अशा स्थितीत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटींसाठी त्याच्या नावाचा विचार करणं योग्य ठरणार नाही. शमी BCCI च्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स' मधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दुखापतीवर उपचार सुरू ठेवेल आणि टेस्टसाठी सज्ज होईल. गुडघ्याच्या दुखापतीतून बाहेर आल्यास त्याला विजय हजारे ट्रॉफीत सहभागी होता येईल.
शमी हा विजय हजारे ट्रॉफीसाठी बंगालच्या संघाचा भाग आहे परंतु शनिवारी दिल्लीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात तो खेळला नाही. त्याच्या फिटनेसबाबत बरीच चर्चा आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा यानं गाबा कसोटीनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या फिजिओकडून याबाबत माहिती मागवली होती.
शमी भारतासाठी ६४ कसोटी, १०१ एकदिवसीय आणि २३ टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यानं गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात घातक गोलंदाजी केली होती. शमीनं या स्पर्धेत अवघ्या ७ सामन्यात २४ बळी घेतले. तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. या वर्षी फेब्रुवारीमध्ये शमीच्या टाचांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या फायनलपासून शमी भारतीय संघाबाहेर आहे. शमीनं गेल्या महिन्यात बंगालकडून रणजी ट्रॉफी सामना खेळून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं आपली चमक दाखवली.
बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी शमी लवकरच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल अशी चर्चा होती. मात्र, संघ व्यवस्थापन शमीबाबत घाई करू इच्छित नाही, असं कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेत सांगितलं. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरा सामना अनिर्णित राहिला. गुरुवारपासून मेलबर्नमध्ये चौथा कसोटी सामना सुरू होत आहे.
संबंधित बातम्या