Mohammed Shami News Marathi : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आज, म्हणजेच बुधवार ११ डिसेंबर रोजी पुन्हा मैदानात उतरणार आहे. मोहम्मद शमी बंगाल क्रिकेट संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या उपांत्यपूर्व सामन्यात खेळताना दिसणार आहे. भारतीय सिलेक्टर्स बरोबरच ऑस्ट्रेलियाची देखील त्याच्यावर बारीक नजर राहणार आहे.
भारतीय संघ व्यवस्थापन आणि मुख्य निवडकर्ता सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. मोहम्मद शमीची कामगिरी कशी होतेय आणि त्याचा फिटनेस कसा आहे याकडं त्यांचं लक्ष राहणार आहे. शमीला एका सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मात्र, नंतर तो गोलंदाजी करतानाही दिसला.
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात मोहम्मद शमीची गरज आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाचीही शमीवर नजर असेल. सध्या जसप्रीत बुमराहला साथ देणारा मोहम्मद सिराज हा एकमेव खेळाडू आहे. हर्षित राणाला पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली, पण हर्षितला दुसऱ्या सामन्यात आपला प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळं सिराज आणि बुमराहवरील दडपण वाढलं आहे. सिराज आणि बुमराहसोबत शमी तिसरा वेगवान गोलंदाज असेल तर भारतीय संघाची गोलंदाजी नक्कीच मजबूत असेल.
मोहम्मद शमीनं जवळपास वर्षभरानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. २०२३ च्या वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना तो भारताकडून खेळला होता. यानंतर तो रणजी करंडक सामन्यात खेळला आणि आता टी-२० क्रिकेट खेळत आहे. टी-२० सामन्यादरम्यान त्याला पुन्हा दुखापत झाली. त्यामुळं त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास उशीर झाला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नॉकआउट फेरीत त्यानं चांगली कामगिरी केली आणि त्याला फिटनेसचा कुठलाही त्रास झाला नाही तर शेवटच्या दोन सामन्यांसाठी त्याचा नक्कीच विचार केला जाऊ शकतो, असं मानलं जात आहे.
संबंधित बातम्या