मोहम्मद शमीने (Mohammed Shami) भारतीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणाऱ्या आणि इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत पराजित करणाऱ्या संघात त्याचे मोलाचे योगदान होते. मागील तीन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तो भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता, सर्वात जलद १०० एकदिवसीय विकेट्स पूर्ण करणारा पहिला भारतीय गोलंदाज शमीच होता.
शमीने मैदानात आणि मैदानाबाहेरही अनेक संकटांना तोंड दिले आहे. वारंवार दुखापती, माजी पत्नीशी संबंधित वैयक्तिक कलह, आपल्या मुलीपासून दूर राहणे आणि सर्वात त्रासदायक - जेव्हा त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. पत्नीने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती, त्यानंतरही बीसीसीआयने शमीसोबतचा करार कायम ठेवला होता. शमीच्या कारकिर्दीतील हा सर्वात काळा टप्पा होता ज्यामुळे त्याच्या मनात जीवन संपवण्याचे विचार येत होते. शमीने यापूर्वी आत्महत्या हा दु:ख संपवण्याचा पर्याय असल्याचेही म्हटले होते, असा खळबळजनक दावा त्याचा मित्र उमेश कुमार याने केला आहे.
उमेश कुमार म्हणाला की, त्या काळात शमी प्रत्येक गोष्टीशी झुंज देत होता. तो माझ्यासोबत माझ्या घरी राहत होता. पण जेव्हा पाकिस्तानसोबत सामना फिक्सिंगचे आरोप झाले आणि त्या रात्री त्याची चौकशी झाली, तेव्हा तो भारावून गेला. तो म्हणाला की मी सर्व काही सहन करू शकतो परंतु माझ्या देशाशी विश्वासघात केल्याचा आरोप नाही, उमेश शुभंकर मिश्राच्या पॉडकास्ट 'अनप्लग्ड' मध्ये बोलत होता.
त्याला "त्या रात्री काहीतरी कठोर निर्णय घ्यायचा होता. त्याला आपलं जीवन संपवायचं होतं. मी पाणी प्यायला उठलो तेव्हा पहाटेचे ४ वाजले होते. मी स्वयंपाकघरात जात असताना तो बाल्कनीत उभा असल्याचे मला दिसले. आम्ही राहत होतो तो १९ वा मजला होता. काय झालं ते मला समजलं. शमीच्या कारकिर्दीतील ती रात्र सर्वात मोठी होती, असे मला वाटते. नंतर एके दिवशी आम्ही बोलत असताना त्यांच्या फोनवर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीकडून क्लीन चिट मिळाल्याचा मेसेज आला. विश्वचषक जिंकला असता तर त्या दिवशी त्याला जेवढा आनंद झाला असता, त्यापेक्षा जास्त आनंद त्याला त्यादिवशी झाला होता.
शमीने आपल्या संघर्षाबद्दल व त्या परिस्थितीबाबत सांगितले की, तुम्ही कशाला जास्त प्राधान्य देता आणि मग समोरच्या व्यक्तीचं विधान कितपत खरं आहे यावर हे अवलंबून असतं. म्हणून जेव्हा आपल्याला माहित असेल की समोरच्या व्यक्तीची कृती अवैध आहे आणि आपल्यासाठी महत्वाची नाही, तेव्हा आपण आपले प्राधान्यक्रम सोडू नयेत. जर मी मोहम्मद शमी नसतो तर आज आहे, माझ्या परिस्थितीची कोणालाही पर्वा नसती आणि प्रसारमाध्यमांनाही त्यात रस नसता. मग ज्या गोष्टीने मला शमी बनवले, ती गोष्ट मी का सोडावी? त्यामुळे लढा देत राहावे लागेल, असे तो म्हणाला.
संबंधित बातम्या