भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९ नोव्हेंबर २०२३ रोजी खेळला होता. आयसीसी विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यापासून शमी टीम इंडियाबाहेर आहे. २०२३ च्या वनडे विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा शमी गुडघ्याला दुखापत असूनही तो वर्ल्डकप खेळला. पण तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे,
दरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या बेंगळुरू कसोटी सामन्यानंतर तो सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखीखाली गोलंदाजी करताना दिसला होता आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी तो संघात पुनरागमन करेल असे मानले जात होते.
पण शमीला मॅच फिटनेस मिळवता आला नाही आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. मात्र, आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी शमी प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करू शकतो, असा दावा केला जात आहे.
एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, शमी रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये दोन सामने खेळताना दिसू शकतो आणि त्यानंतर तो थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो. शमी बंगालकडून अनुक्रमे ६ आणि १३ नोव्हेंबरदरम्यान कर्नाटक आणि मध्य प्रदेशविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. जर शमी या दोन सामन्यांमध्ये पूर्णपणे फिट दिसला तर तो थेट ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो.
यापूर्वी शमीने चाहत्यांची आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) माफी मागितली होती, कारण बोर्डाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याच्या पुनरागमनाची घाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. शमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) त्याचे पुनर्वसन पूर्ण झाले. पण गुडघ्याला सूज आल्याने त्याचा कमबॅकचा प्लॅन रखडला.
विशेष म्हणजे, शमीने नुकतेच आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचे जाहीर केले होते. शमीने त्याच्या सरावाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तो लवकरच पुनरागमन करणार असल्याचे सांगितले.
तो म्हणाला होता की, "मी दिवसेंदिवस माझ्या गोलंदाजीच्या फिटनेसमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. सामन्यासाठी सज्ज होण्यासाठी आणि देशांतर्गत लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्यासाठी मी कठोर परिश्रम करत राहीन. मी सर्व क्रिकेट चाहत्यांची आणि बीसीसीआयची माफी मागतो. पण लवकरच मी लाल चेंडूचे क्रिकेट खेळायला तयार असेन, लव्ह यू ऑल. '
संबंधित बातम्या