मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024: गुजरातकडून शमीच्या बदली खेळाडूची घोषणा; अंडर-१९ वर्ल्डकपचा हिरो मुंबईच्या संघात!

IPL 2024: गुजरातकडून शमीच्या बदली खेळाडूची घोषणा; अंडर-१९ वर्ल्डकपचा हिरो मुंबईच्या संघात!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 20, 2024 10:36 PM IST

Mohammed Shami Replacement Announced: गुजरात टायटन्सने मोहम्मद शमीच्या बदलीची घोषणा केली आहे. तर, मुंबई इंडियन्सने दिलशान मदुशंकाच्या जागी अंडर-१९ विश्वचषकात धुमाकूळ घालणाऱ्या गोलंदाजाची निवड केली.

गुजरात टायटन्सने दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली.
गुजरात टायटन्सने दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली.

IPL 2024: येत्या २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२४ पूर्वी गुजरात टाययन्सने (Gujarat Titans) स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) बदलीची घोषणा केली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो आयपीएलच्या १७ व्या (IPL 17) हंगामातून बाहेर पडला होता.

गुजरात टायटन्सकडून सर्वाधिक ४८ विकेट घेणाऱ्या शमीच्या टाचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या तो दुखापतीतून सावरत आहे. परंतु, दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे. यामुळे गुजरात टायटन्सने मोहम्मद शमीच्या जागेवर संदीप वॉरियरची निवड केली आहे. संदीप वॉरियरने आतापर्यंत पाच आयपीएल सामने खेळले आहेत आणि तो ५० लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये गुजरात टायटन्समध्ये सामील होईल.

तामिळनाडूचा डावखुरा वेगवान गोलंदाज वॉरियरने विजय हजारे करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करत ५ सामन्यांत ११ विकेट घेतले आहेत. आयपीएल २०२२ मध्ये विजेतेपदावर नाव कोरण्यात हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शामीचा मोठे योगदान होते. मात्र, संघाला या हंगामात दोन्ही खेळाडूंची उणीव भासणार आहे. परंतु, काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्या त्याची जुनी फ्रंचायझी मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. तर, मोहम्मद शामी दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. या हंगामात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल गुजरातच्या संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. आयपीएल संघाचा कर्णधार म्हणून गिलचा हा पहिलाच हंगाम असेल. गुजरातचा संघ २४ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

मदुशंकाच्या जागी क्वेना माफाका मुंबईच्या संघात एन्ट्री

मुंबई इंडियन्सला मदुशंकाच्या जागी क्वेना माफाका संघात स्थान देण्यात आले. तर, दुसरीकडे जेसन बेहरेनडॉर्फ बाहेर पडल्याने मुंबई इंडियन्सला आणखी एक दुखापतीचा धक्का बसला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकालाही संपूर्ण हंगामासाठी अनफिट घोषित करण्यात आले. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या क्वेना माफाकाला संधी देण्यात आली, ज्याने गेल्या महिन्यात १९ वर्षांखालील विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. मधुशंका आणि मफाका हे दोघेही डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत.

सूर्यकुमार सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार?

मुंबई इंडियन्सला जीटीविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला फलंदाज सूर्यकुमार यादवची ही कमतरता भासणार आहे. सूर्याला अद्याप एनसीएकडून परवानगी मिळालेली नाही. गुरुवारी त्याची आणखी एक फिटनेस तपासणी करण्यात येणार आहे.

WhatsApp channel