mohammed shami took injections in world cup 2023 : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. पण नुकत्यात झालेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात शमीने सर्वाधिक बळी घेतले. त्याने अवघ्या ७ सामन्यात २४ फलंदाजांची शिकार केली.
पण, सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला त्याला मुकावे लागले आहे. कारण त्याच्या दुखापतीने गंभीर रूप धारण केले आहे.
त्याचवेळी, आता मोहम्मद शमीच्या फिटनेसशी संबंधित एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, मोहम्मद शमी वर्ल्ड कप सामन्यांदरम्यान दुखापतीशी झुंजत होता. पण तरी तो वर्ल्डकप सामने खेळत राहिला. वेदनामुक्त राहण्यासाठी शमीने वारंवार इंजेक्शन घेऊन सामने खेळले.
मोहम्मद शमीसोबत बंगालकडून खेळणाऱ्या एका क्रिकेटपटूने पीटीआयला सांगितले की, शमीला डाव्या टाचेची गंभीर समस्या आहे. पण खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. मोहम्मद शमीला वर्ल्ड कप सामन्यांदरम्यान वेदना होत होत्या, पण तो सतत इंजेक्शन घेत होता. शमीने इंजेक्शन घेऊन विश्वचषकात खेळणे सुरूच ठेवले'.
त्याच वेळी, वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली. मात्र मोहम्मद शमी टीम इंडियाकडून खेळत नाहीये. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा सहज पराभव केला. मोहम्मद शमीच्या जागी प्रसिध कृष्णाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. पण प्रसिद्ध कृष्ण अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही.
प्रसिध कृष्णाने सेंच्युरियन कसोटीत २० षटके टाकली. ज्यामध्ये ४.७च्या इकॉनॉमीसह ९३ धावा खर्च केल्या आणि फक्त १ बळी घेतला.