जेव्हा कधी टीम इंडियातील वेगवान गोलंदाजांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात मोहम्मद शमीचे नाव सोनेरी अक्षरांमध्ये असेल. मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, लवकरच त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे.
मोहम्मद शमीने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्या वर्ल्डकपमध्ये भारताला फायनलपर्यंत नेण्यात शमीची खूप मोठी भूमिक होती.
मात्र, भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. विश्वचषकादरम्यान शमीला घोट्याला गंभीर दुखापत झाली होती, तरीही तो स्पर्धेत खेळत राहिला. या दुखापतीमुळे तो सध्या क्रिकेटपासून दूर असून तो पुनरागमनाची तयारी करत आहे.
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, मोहम्मद शमी पहिल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. मात्र, विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याच्या जागी मोहम्मद शमीचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला.
यानंतर शमीने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि संपूर्ण वर्ल्डकपमध्ये आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला. त्याने सर्व सामन्यांमध्ये भारतासाठी सातत्याने विकेट्स घेण्यास सुरुवात केली. शमीने वर्ल्डकपच्या ७ सामन्यांत २४ बळी घेतले.
शमीने गेल्या CEAT क्रिकेट पुरस्कारादरम्यान त्याच्या विश्वचषक प्रवासाबद्दल सांगितले, याचा व्हिडिओ रविवारी स्टार स्पोर्ट्सने सार्वजनिक केला. पुरस्कार सोहळ्याला राहुल द्रविड, रोहित शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची उपस्थिती होती.
यावेळी शमीने अँकर मयंती लँगरशी केलेल्या संभाषणात, विश्वचषकातील कामगिरीबद्दल तपशीलवारपणे सांगितले. तो म्हणाला, की आपण खेळलेल्या तीनही एकदिवसीय विश्वचषकांमध्ये (२०१५, २०१९ आणि २०२३) तो पहिल्या पसंतीचा गोलंदाज नव्हता. मात्र, निवड संधी मिळाल्यानंतर त्याने दमदार कामगिरी करत संधीचे सोनं केले.
शमी पुढे म्हणाला, की मला याची सवय झाली आहे. माझी २०१५, २०१९ आणि २०२३ मध्ये अशीच सुरुवात झाली होती. जेव्हा मला संधी दिली गेली, तेव्हा चांगली कामगिरी झाली. तसेच, मी तेव्हा देवाचे आभार मानतो की माझ्या कामगिरीमुळे मला पुन्हा संघातून काढण्याचा विचार केला नाही". मी संधीसाठी नेहमीच तयार असतो. तुम्ही तयार असाल तेव्हाच तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. नाहीतर, केवळ वॉटर बॉय म्हणून दिसाल! संधी आली की, त्याचा फायदा करून घेणे कधीही चांगले".