टीम इंडियाला सध्या मोहम्मद शमीची चांगलीच उणीव भासत आहे. तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियापासून दूर आहे. शमी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दुखापतग्रस्त झाला होता, तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे.
दरम्यान, सध्या शमीची फिटनेस कशी आहे आणि तो कधीपर्यंत सामन्यात उतरू शकतो? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तसेच, पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी तंदुरुस्त होईल का? अशी चर्चा सुरू आहे. या दरम्यानच, आता मोहम्मद शमीने स्वतः त्याच्या फिटनेसबाबत एक अपडेट दिले आहे.
मोहम्मद शमी सध्या एनसीए बंगळुरूमध्ये आहे. या दरम्यान, 'युजेनिक्स हेअर सायन्सेस'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शमीने सांगितले की, गेल्या काही दिवसांत त्याने ज्याप्रकारे गोलंदाजी केली त्यामुळे तो खूप खूश आहे. त्याने सांगितले की आधी तो अर्ध्या रनअपसह गोलंदाजी करत होता कारण त्याला जास्त दबाव घ्यायचा नव्हता.
पण आता त्याने पूर्ण रनअपसह गोलंदाजी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेबाबत शमी म्हणाला की, त्याला आता काहीच वेदना होत नाहीत. तो ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी जाऊ शकेल की नाही असा प्रश्न अनेक दिवसांपासून सर्वांनाच पडला होता, पण त्यासाठी अजून थोडा वेळ बाकी आहे.
सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याला त्याच्या राज्य संघ बंगालसाठी काही सामने खेळायला आवडेल, असेही शमीने सांगितले. तो म्हणाला की त्याला फक्त एकच गोष्ट सुनिश्चित करायची आहे की तो तंदुरुस्त राहील.
शमी पुढे म्हणाला की ऑस्ट्रेलियात कोणत्या प्रकारचे आक्रमण आवश्यक आहे हे मला माहीत आहे. मैदानावर जास्त वेळ घालवावा लागेल. त्यापूर्वी काही रणजी सामने खेळायचे असल्याचे शमीने सांगितले.
टीम इंडिया बऱ्याच दिवसांपासून मोहम्मद शमीशिवाय खेळत आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना जसप्रीत बुमराह हा एकमेव गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणू शकला होता. मोहम्मद सिराजला अपेक्षित असलेला प्रभाव टाकण्यात यश आले नाही.
अशा परिस्थितीत शमी संघाकडून खेळत असता तर कदाचित भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी केली असती आणि सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. यावेळी या मालिकेत एकूण ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत ही मालिका मोठी होणार आहे. मोहम्मद सिराज सध्या अपेक्षित फॉर्ममध्ये नाही. म्हणजेच शमी या मालिकेत नसेल तर बुमराहला संपूर्ण भार एकट्याने उचलावा लागेल.
जे ५ सामन्यांच्या मालिकेत कुठेही चांगले ठरणार नाही. मोहम्मद शमीचा फिटनेस कसा राहतो हे पाहायचे आहे. तो तंदुरुस्त असेल आणि सर्वच नाही तर काही सामने नक्कीच खेळेल अशी अपेक्षा केली पाहिजे.
संबंधित बातम्या