Vijay Hazare Trophy Pre quarter finals : बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून रंगणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच सर्व संघांची घोषणा होणार आहे. टीम इंडियात वेगवान गोलंदज मोहम्मद शमी याची निवड होणार की नाही, हा सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे.
शमीची फिटनेस हा त्याच्या निवडीच्या आड येत आहे. पण सध्या चालू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीत धारदार गोलंदाजी करत आहे आणि त्याची फिटनेसही उत्तम असल्याचे दिसून येत आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये आज गुरुवारी वडोदरा येथे दोन सामने झाले. हे दोन्ही प्री-क्वार्टर सामने होते. पहिल्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये बंगाल आणि हरियाणा आमनेसामने होते. या सामन्यात निवडकर्त्यांपासून क्रिकेट चाहत्यांपर्यंत सर्वांचीच नजर शमीवर होती.
शमी किती तंदुरुस्त आहे आणि त्याचा फॉर्म कसा आहे हे सर्वांना जाणून घ्यायचे होते. शमीने ३ विकेट घेत सर्वांना उत्तर दिले आहे.
शमीने आज गुरुवारी (९ जानेवारी) विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याची टीम बंगालसाठी सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याने १० षटकात ६१ धावा खर्च केल्या. मात्र, शमीची ही कामगिरी बंगालला विजय मिळवून देऊ शकली नाही.
हरियाणाकडून त्यांना पराभव पत्करावा लागल्याने बंगालचा विजय हजारे ट्रॉफीमधील प्रवासही संपुष्टात आला आहे. या सामन्यात हरयाणाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद २९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बंगालचा संघ २२६ धावांवर गारद झाला.
त्यांच्याकडून निशांत सिंधू (६४) आणि पार्थ (६२) यांनी अर्धशतके झळकावली. एकवेळ हरियाणाने ४ गडी गमावून १८० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यावेळी ते ३२५ पर्यंत मजल मारू शकतात असे वाटत होते. मात्र मोहम्मद शमीच्या साथीने मुकेश कुमार आणि सहकारी गोलंदाजांनी हरियाणाला ३०० धावांच्या आत रोखले. मोहम्मद शमीने १० षटकात ६१ धावा देत ३ बळी घेतले. मुकेश कुमारने ९ षटकात ४६ धावा देत २ बळी घेतले. मात्र बंगालला हा सामना जिंकता आला नाही. २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगालचा संघ ४३.१ षटकात २२६ धावा करून सर्वबाद झाला.
तामिळनाडूसाठी वरुण चक्रवर्तीचे ५ विकेट
दरम्यान, याच स्पर्धेतील दुसऱ्या प्री क्वार्टर फायनल सामन्यात वरुण चक्रवर्तीने तामिळनाडूसाठी ५ बळी घेत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.
या सामन्यात राजस्थान आणि तामिळनाडू आमनेसामने होते. या सामन्यात तामिळनाडूने राजस्थानला ४७.३ षटकात २६७ धावांवर सर्वबाद केले. एकवेळ राजस्थानने एका विकेटवर १८४ धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर वरुण चक्रवर्तीची जादू चालली. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने ५ विकेट घेतल्या. त्यामुळे राजस्थानला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत.
राजस्थानचा सलामीवीर अभिजीत तोमरने १११ आणि कर्णधार महिपाल लोमरने ६० धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. वरुणने ही भागीदारी तोडली आणि यानंतर राजस्थानला गारद करायला तामिळनाडूच्या गोलंदाजांना वेळ लागला नाही.
तामिळनाडूचे फलंदाज फ्लॉप, सामना गमावला
राजस्थानच्या २६८ धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूची फलंदाजी फ्लॉप झाली आणि त्यांचा संघ ४७.१ षटकात २२७ धावांवर गारद झाला. त्यांच्याकडून एन जगदीसनने ६५ आणि विजय शंकर याने ४९ धावांची खेळी केली.
संबंधित बातम्या