मोहम्मद शमी जवळपास वर्षभरानंतर मैदानात परतला आहे. मोहम्मद शमी पश्चिम बंगालकडून रणजी ट्रॉफी खेळत आहे. त्याने इंदूरमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध नेत्रदीपक गोलंदाजी केली. या वेगवान गोलंदाजाचा सीम आणि स्विंग पाहण्यासारखा होता. त्याने आपल्या सीम आणि स्विंगने विरोधी फलंदाजांना थक्क केले. मध्य प्रदेशच्या पहिल्या डावात मोहम्मद शमीने १९ षटकात ५४ धावा देत ४ बळी घेतले.
मोहम्मद शमीने शुभम शर्मा, सरांश जैन, कुमार कार्तिकेय आणि कुलवंत खेजरोलिया यांना बाद केले. त्याच वेळी, मध्य प्रदेश पहिल्या डावात १६७ धावांवर गारद झाला.
बीसीसीआयने मोहम्मद शमीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोहम्मद शमी जबरदस्त लयीत दिसत आहे. मोहम्मद शमीला जबरदस्त फॉर्ममध्ये पाहणे भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोहम्मद शमीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बंगालने २२८ धावा केल्या. याला प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचा संपूर्ण संघ १६७ धावांवर गारद झाला. अशा प्रकारे, पहिल्या डावाच्या आधारे बंगालला ६१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.
बंगालकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय सूरज सिंधू जैस्वाल आणि मोहम्मद कैफ यांना प्रत्येकी २ विकेट मिळाले. रोहित कुमारने १ विकेट आपल्या नावावर केली.
वृत्त लिहेपर्यंत बंगालची धावसंख्या दुसऱ्या डावात २ बाद ८६ अशी आहे. अशा प्रकारे बंगालची आघाडी १४७ धावांपर्यंत वाढली आहे. बंगालकडून अनुस्तुप मजुमदार आणि सुदीप चॅटर्जी क्रीजवर आहेत. आतापर्यंत अरुण पांडे आणि कुमार कार्तिकेय यांना मध्य प्रदेशकडून प्रत्येकी १ विकेट मिळाला आहे.