रोहित शर्मा आणि विराटनं रणजी स्पर्धेत खेळायला हवं; न्यूझीलंड विरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवामुळं माजी खेळाडू भडकला!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रोहित शर्मा आणि विराटनं रणजी स्पर्धेत खेळायला हवं; न्यूझीलंड विरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवामुळं माजी खेळाडू भडकला!

रोहित शर्मा आणि विराटनं रणजी स्पर्धेत खेळायला हवं; न्यूझीलंड विरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवामुळं माजी खेळाडू भडकला!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 06, 2024 04:05 PM IST

Mohammad Kaif advice virat and rohit : न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ टीकेच्या रडारवर आला आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली
रोहित शर्मा, विराट कोहली (PTI)

Mohammad Kaif on Team India Defeat : न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतीय संघावर चौफेर टीका होत आहे. काही माजी क्रिकेटपटूंनी संघात अनेक बदल सुचवले आहेत, तर काहींनी कर्णधार रोहित शर्मा व विराटसह संघातील मोठ्या खेळाडूंना लक्ष्य केलं आहे. या लोकांनी सध्या रणजी ट्रॉफीत खेळावं, असा सल्ला माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानं दिला आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं २५ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. भारतीय संघाला घरच्या मैदानावर किमान तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच ०-३ असा पराभव पत्करावा लागला आहे. ही बाब चाहत्यांसह माजी क्रिकेटपटूंच्या मनाला लागली आहे. मोहम्मद कैफनं यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

कैफनं 'एक्स'वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, 'रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा फॉर्म हरवला आहे. ते धावा करताना चाचपडत आहेत. त्यांना पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी तासन् तास फलंदाजी करण्याची गरज आहे. रोहित, विराट आणि जे फॉर्ममध्ये नाहीत त्यांनी स्थानिक क्रिकेट खेळलं पाहिजे. तिथं शतक झळकावलं तर त्याचा त्यांना खूप फायदा होईल आणि त्यांचं मनोधैर्य वाढेल. स्थानिक क्रिकेट खेळताना त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार नाही. कार, विमानाची सुविधा मिळणार नाही हे खरं आहे. पण फॉर्म हवा असेल तर ते सगळं सोडावं लागेल, असा टोलाही कैफनं हाणला.

कैफनं दिलं रिषभ पंतचं उदाहरण

'रिषभ पंतचं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यानं गाबा इथं विजयी धावा केल्या, परंतु त्या दौऱ्यात तो वनडे किंवा टी-२० संघाचा भाग नव्हता. तो फक्त कसोटी मालिकेसाठी तिथं गेला होता. तिथं त्याच्याआधी वृद्धिमान साहा खेळला होता. पण जेव्हा भारत ३६ धावांवर ऑलआऊट झाला आणि आम्ही सामना गमावला, तेव्हा पंतचा समावेश करण्यात आला. पंत त्या दौऱ्यात एक सराव सामना खेळला होता, जो गुलाबी चेंडूचा सामना होता आणि त्यानं शतक झळकावलं, त्यानंतर त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला, त्यामुळं तो पूर्णपणे वेगळा खेळाडू म्हणून पुढं आला, याची आठवण कैफनं दिली.

Whats_app_banner