वनडे वर्ल्डकप २०२३ च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न धुळीस मिळवले.
दरम्यान, आता या वर्ल्डकप फायनलबाबत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने एक मोठे वक्तव्य केले आहे. वर्ल्डकप फायनलच्या पीचबाबत कैफने मोठा दावा केला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे सलग तीन दिवस अहदाबादमधील पीचजवळ जात होते आणि पीचचा रंग कसा बदलतोय हेदेखील त्यांनी पाहिले होते, असे कैफने एका मुलाखतीत सांगितले आहे.
वास्तविक, कैफने नुकतीच एका चॅनेलला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने वनडे वर्ल्डकप २०२३ मधील फायनलच्या खेळपट्टीबाबत अनेक मोठे दावे केले आहेत.
कैफ म्हणाला, "मी तिथे तीन दिवस होतो. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड खेळपट्टीवर पाहणीसाठी यायचे. ते सलग तीन दिवस पीच कशी आहे, ते पाहायला आले होते. मी खेळपट्टीचा रंग बदलताना पाहिले होते. त्यांच्याकडे कमिन्स आणि स्टार्क आहेत. त्यांच्याकडे उत्तम वेगवान गोलंदाजी आहे, त्यामुळे पीच संथ ठेवली गेली. इथे चूक झाली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये झाला. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २४० धावा केल्या. कर्णधार रोहितने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. विराट कोहलीने ५४ धावा केल्या. केएल राहुलने ६६ धावांची खेळी केली. राहुलने १०७ चेंडूत केवळ एकच चौकार मारला.
तर ऑस्ट्रेलियाकडून घातक गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने ३ बळी घेतले. पॅट कमिन्सने २ बळी घेतले. हेझलवूडलाही २ बळी मिळाले. ग्लेन मॅक्सवेल आणि ॲडम झाम्पा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने ४३ षटकांतच लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून ट्रॅव्हिस हेडने झंझावाती शतक झळकावले. त्याने १२० चेंडूत १३७ धावा केल्या. लॅबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना ६ विकेटने जिंकला होता.
संबंधित बातम्या