इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने अनेक प्रसंगी इंग्लंडसाठी दमदार परफॉर्मन्स दिला आहे. मोईनचा भारताविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. त्याने विराट कोहलीला मैदानावर खूप त्रास दिला आहे. मोईनने कोहलीला १० वेळा बाद केले आहे.
पण आता त्याने आपल्या करिअरचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीची घोषणा करताना मोईन अली म्हणाला की, इंग्लंड क्रिकेट संघाला पुढे जाण्याची गरज आहे.
दरम्यान, मोईनचे चेन्नई सुपर किंग्जशी खास नाते आहे. त्याने आयपीएलमध्ये अनेकदा सीएसके संघासाठी दमदार कामगिरी केली आहे.
मोईन अलीने २०१४ मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १३८ वनडे आणि ६८ कसोटी सामने खेळले आहेत. तसेच ९२ टी-20 सामने खेळले.
मोईनने नुकतीच मेल स्पोर्टला मुलाखत दिली होती. यावेळी तो म्हणाला होता, की ‘‘इंग्लंडकडून खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. मी आणखी काही दिवस स्वत:वर नियंत्रण ठेवू शकतो आणि संघासाठी खेळू शकतो. पण मला सत्य माहीत आहे. मी आता खेळू शकत नाही असे नाही. पण मला माहित आहे की आता इंग्लंड क्रिकेट संघाला पुढे जाण्याची गरज आहे".
मोईनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्याने १३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २३५५ धावा केल्या आहेत. त्याने ३ शतके आणि ६ अर्धशतके केली. मोईनने या फॉरमॅटमध्ये १११ विकेट्सही घेतल्या आहेत.
सोबतच त्याने इंग्लंडकडून ६८ कसोटी सामन्यांमध्ये ३०९४ धावा केल्या आहेत. यात त्याने ५ शतके आणि १५ अर्धशतके केली. सोबतच कसोटीत २०४ विकेट्स घेतल्या आहेत.
मोईनने ९२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२२९ धावा केल्या आहेत. यासोबतच ५१ विकेट्सही घेतल्या आहेत.
मोईनने विराटला खूप त्रास दिला आहे. त्याने आतापर्यंत १० वेळा विराट कोहलीला बाद केले आहे. मोईनने त्याला सर्वाधिक कसोटीत ६ वेळा बाद केले. कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिल्यास मोईनने त्याच्याविरुद्ध ३९३ चेंडू टाकले आहेत. या कालावधीत १९६ धावा दिल्या. मोईनची फिरकी खेळणे विराटला नेहमीच कठीण गेले.