Border- Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात यजमान संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सर्वात जलद १०० बळी घेण्याचा विक्रम केला. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीला मागे टाकले. ब्रेट लीने आपल्या कारकिर्दीतील ५५ व्या डावात हा पराक्रम पूर्ण केला. तर, स्टार्कने त्याच्यापेक्षा एक डाव कमी घेत हा विक्रम केला. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्टार्कने १० षटकांत ३३ धावा देत तीन बळी घेतले.
मिचेल स्टार्कने आपल्या स्पेलमध्ये अब्दुल्ला शफीक आणि सईम अयूब सह शाहीन आफ्रिदीची शिकार केली. ब्रेट ली, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, क्रेग मॅकडरमॉट आणि स्टीव्ह वॉ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर १०० एकदिवसीय बळी घेणारा तो सहावा गोलंदाज ठरला.
१) मिचेल स्टार्क- ५४ डाव
२) ब्रेट ली- ५५ डाव
३) ग्लेन मॅकग्रा- ५६ डाव
४) शेन वॉर्न- ६१ डाव
५) क्रेग मॅकडरमॉट- ७१ डाव
६) स्टीव्ह वॉ- ९३ डाव
मिचेल स्टार्कचा स्ट्राईक रेट या सहा खेळाडूंमध्ये सर्वोत्तम आहे आणि ऑस्ट्रेलियात किमान ५० एकदिवसीय बळी घेणाऱ्या खेळाडूंमध्ये क्लिंट मॅके (२४.७) नंतर तो दुसरा गोलंदाज आहे. मिचेल स्टार्कने आपल्या घरच्या मैदानावर सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत स्टीव्ह वॉला मागे टाकले आहे. वॉने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियात १०१ विकेट्स घेतल्या होत्या. तर, स्टार्कने आता १०२ बळी घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ब्रेट लीच्या नावावर आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत १६९ बळी घेतले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लवकरच बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारताने संघ जाहीर केला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाने अद्याप आपला संघ जाहीर केला नाही. या मालिकेत मिचेल स्टार्कला संघात जागा मिळल्यास भारतासमोर मोठे आव्हान असेल. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला ३-० असा पराभव स्वीकारावा लागला आहे.