भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे. पण या कसोटीपूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू प्रचंड घाम गाळत आहेत. पर्थ कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन सराव सत्रातून एक नवी माहिती समोर आली आहे.
सराव सत्रादरम्यान मिचेल स्टार्क याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डाव्या हाताच्या गोलंदाजाने अर्धा लाल आणि अर्धा पांढऱ्या रंगाच्या चेंडूने सराव केला. असा चेंडू वापरल्याने हँड-आय कॉर्डिनेशन सुधारते. तसेच, अप्रतिम स्विंग देखील मिळतो, असे बोलले जाते. यातून ऑस्ट्रेलियन फलंदाजांची तयारी चांगल्या पद्धतीने होत आहे.
मिचेल स्टार्क हा एक असा दुर्मिळ वेगवान गोलंदाज आहे जो पांढरा चेंडू स्विंग दोन्ही दिशेने स्विंग करू शकतो. विशेष म्हणजे पांढरा चेंडू म्हणजेच वनडे आणि टी-20 मध्ये वापरला जाणारा चेंडू लाल आणि गुलाबी चेंडूपेक्षा कमी स्विंग होतो.
अशा स्थितीत भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी स्टार्कच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगला सराव मिळत आहे.
ऑस्ट्रेलिया वेगवान गोलंदाजांच्या फायद्याची पीच तयार करेल, यात शंका नाही. पण, ही चाल दुधारी तलवार असू शकते कारण सध्याच्या भारतीय संघात भरपूर गोलंदाज आहेत जे स्विंग परिस्थितीत आपली जादू चालवू शकतात.
स्टार्ककडून २०२४ मध्ये सर्वोत्तम कामगिरी झाली नाही कारण त्याने १० डावात ३२.२५ च्या सरासरीने आणि ४९.६० च्या स्ट्राइक रेटने २७ बळी घेतले आहेत. त्याने ३.८९ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.
मिचेल स्टार्कला भारताविरुद्ध फारसे यश मिळालेले नाही कारण कसोटी क्रिकेटमध्ये आशियाई दिग्गजांविरुद्ध त्याची सरासरी ३८.५४ आहे. स्टार्कला भारताविरुद्धचा आपला रेकॉर्ड सुधारायचा आहे आणि ऑस्ट्रेलियन संघाला २०१७ नंतर प्रथमच प्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्यात मदत करायची आहे.