टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने हरले आहेत. तर तिसरा सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर खेळला जाणार आहे.
एखाद्या पार्ट टाईम क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूने टीम इंडियासारख्या बलाढ्य संघाचा बॅंड वाजवला, असे म्हटले तर कदाचित कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे प्रत्यक्षात घडले आहे. पुणे कसोटीत एका पार्ट टाईम क्रिकेटपटूने टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांना धुळ चारली आहे. त्या पार्टटाईम क्रिकेटरचे नाव आहे मिचेल सँटनर.
न्यूझीलंडचा स्टार फिरकीपटू मिचेल सँटनर याने मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारताचे १३ बळी घेतले. सँटनरने पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात ६ बळी घेतले.
जर आपण सँटनरच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर नजर टाकली तर, त्याच्या बायोमध्ये त्याने स्वतःला 'पार्ट टाइम क्रिकेटर' आणि 'फुल टाइम गोल्फर' असे लिहिले आहे. सॅंटनरच्या बायोमध्ये लिहिलेली ही गोष्ट सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे.
अशा स्थितीत आता एवढेच म्हणता येईल की, एका पार्टटाईम क्रिकेट खेळणाऱ्या एका गोल्फरने पुणे कसोटीत टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. १३ बळी घेणाऱ्या सँटनरला पुणे कसोटीत 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला.
मिचेल सँटनर स्वत:ला पार्ट टाईम क्रिकेटर म्हणत असला तरी तो न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅट खेळतो. आत्तापर्यंत सँटनरने २९ कसोटी, १०४ एकदिवसीय आणि १०४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
सँटनरने कसोटीच्या ४९ डावांत ६७ विकेट घेतल्या आणि ४१ डावांत ९४१ धावा केल्या. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांच्या ९९ डावात १०७ विकेट घेतल्या आणि ७८ डावात १३५५ धावा केल्या. टी-20 इंटरनॅशनलमध्ये सँटनरने १०४ डावात ११५ विकेट घेतल्या आणि ७० डावात फलंदाजी करताना ६७५ धावा केल्या. सॅन्टनरने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
संबंधित बातम्या