Mitchell Marsh Speech, Alan Border Award 2023 : स्टार अष्टपैलू मिचेल मार्श याला ऑस्ट्रेलिन क्रिकेटमधील सर्वात मोठा ॲलन बॉर्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मार्शने गेल्या वर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मार्शला सर्वाधिक २२३ मते मिळाली.
विशेष म्हणजे, ॲलन बॉर्डर पुरस्काराच्या शर्यतीत मार्शने स्टीव्ह स्मिथ आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्स यांचा पराभव केला. ॲलन बॉर्डर सन्मान मिळाल्यानंतर मिचेल मार्शने एक मजेदार भाषण दिले, हे भाषण आता व्हायरल होत आहे.
मिशेल मार्श आपल्या भाषणात कधी भावूक झाला तर कधी आपल्या फनी स्टाइलने सगळ्यांना हसवले. याच भाषणात तो म्हणाला, की तो थोडा लठ्ठ आहे आणि त्याला बिअर पिणे देखील आवडते.
मिचेल मार्शने आपल्या भाषणाची सुरुवात पत्नी ग्रेटा हिचे आभार मानून केली. तो म्हणाला, ‘ग्रेटा एक अद्भुत व्यक्ती आहे. मी माझ्या लग्नाच्या वेळी म्हटले होते की, ग्रेटाने मला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे. तिच्यासोबत माझे आयुष्य खूप गोड झाले आहे. मी क्रिकेटच्या मैदानावर चांगली कामगिरी केली की नाही. मी शतक केली की शून्यावर आऊट झालो, परिस्थिती कशीही असो ती माझ्यासोबत नेहमी सारखीच असते’.
यानंतर मार्श भावूक झाला आणि म्हणाला, 'मला माझ्या कर्णधार आणि प्रशिक्षकाचे आभार मानायचे आहेत. मी या संघात खेळून खूप आनंदी आहे. गेल्या दीड वर्षात या संघासोबत खेळताना मला खूप आनंद झाला आहे. संघाने खूप यश मिळवले आणि त्यात माझ्या योगदानामुळे मी खूप आनंदी आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मला पॅट कमिन्स आणि प्रशिक्षक मॅकडोनाल्डचे आभार मानायचे आहेत.
हे सांगताना मार्श भावूक झाला होता, मात्र यानंतर त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवत एक अशी गोष्ट सांगितली की, त्यामुळे सगळेच हसायला लागले. मार्श म्हणाला, "मला बियर प्यायला आवडते म्हणून मला कधीकधी थोडी चरबी येते." मी दुपारच्या जेवणात ४ बिअर पितो आणि तिथेच थांबतो. हे ऐकून सर्वजण मोठ्याने हसायला लागले'.