IND vs ENG Weather Report : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा दुसरा सेमी फायनल सामना आज (२७ जून) भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना गुरुवारी (२७ जून) भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळला जाईल.
पण याआधी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने आयसीसीवर गंभीर आरोप केले आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताला फायदा करून देत आहे, आणि इतर संघांशी भेदभाव करत आहे, असा आरोप वॉनने केला आहे.
वॉन म्हणाला, की वर्ल्डकपचा पहिला सेमी फायनल सामना ग्रुप १ मधील अव्वल संघ (भारत) आणि ग्रुप २ मधील दुसऱ्या स्थानावरील संघ (इंग्लंड) यांच्यात व्हायला पाहिजे. पण भारत आणि इंग्लंड दुसरी सेमी फायनल खेळत आहेत.
विशेष म्हणजे, या सामन्यावर म्हणजेच दुसऱ्या सेमी फायनलवर पावसाचे सावट आहे. या सामन्याला राखीव दिवस नाही आणि सामना झाला नाही तर गुणतालिकेच्या आधारे भारत थेट फायनलध्ये जाईल, अशी स्थिती आहे.
वास्तविक, पहिला सेमी फायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदाद येथे खेळला गेला.
दरम्यान, T20 विश्वचषक २०२४ सुरू होण्यापूर्वीच, सुपर ८ मध्ये त्यांची रँक कोणतीही असली तरी, भारत दुसरी सेमी फायनलच खेळेल, हे ठरले होते. आयसीसीने याचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नव्हते.
मात्र भारतीय प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचे दिसते. पहिला उपांत्य सामना स्थानिक वेळेनुसार, २६ जून रोजी रात्री होता, जो भारतात सकाळी ६ वाजता (२७ जून) सुरू झाला असता. तर दुसरा उपांत्य सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.
गयानामध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच २७ जून रोजी पावसाची ६० ते ७० टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना पूर्ण खेळ पाहायला मिळणार की नाही हे पाहणे बाकी आहे. स्थानिक वेळेनुसार, सामना सकाळी १०:३० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता) सुरू होईल. सकाळी म्हणजेच सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता सुमारे ३५ टक्के आहे, जी दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
पावसामुळे भारत-इंग्लंड सामना रद्द झाला, तर त्याचा फायदा रोहित शर्माच्या संघाला होईल. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल आणि इथे त्याचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. खरेतर, दुसरा उपांत्य फेरीचा सामना रद्द झाल्यास, गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळेल.
भारतीय संघ गट-१ मध्ये अव्वल आहे, त्यामुळे सामना रद्द होताच रोहित ब्रिगेडला अंतिम फेरीत स्थान मिळेल.
संबंधित बातम्या