महिला प्रीमियर लीगचा (wpl 2024) सहावा सामना आज (२८ फेब्रुवारी) मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियवर युपीची कर्णधार अलिसा हिलीने टॉस जिंकून प्रथम गोलंदीजाचा निर्णय घेतला.
यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात युपीने १६.३ षटकात ३ बाद १६३ धावा करून सामना जिंकला.
या विजयासह मुंबई इंडियन्सचा या मोसमातील पहिला पराभव झाला. तर युपीने WPL 2024 चा पहिला विजय मिळवला.
या विजयासह यूपीचे तीन सामन्यांतून २ गुण झाले आहेत. गुणतालिकेत ते चौथ्या स्थानावर आले आहेत. यूपी वॉरियर्सचा नेट रन रेट -०.३५७ आहे. दुसरीकडे, मुंबईचे तीन सामन्यांतून ४ गुण आहेत. त्यांचा नेट रन रेट -०.१८२ पर्यंत घसरला आहे.
१६२ धावांचा पाठलाग करताना युपीच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. अलिसा हिली आणि किरण नवगिरे यांनी ९६ धावांची सलामी दिली.
किरण नवगिरेने स्फोटक अर्धशतक झळकावले. तिने ३१ चेंडूत ५७ धावांची खेळी खेळली. तिने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. कर्णधार ॲलिसा हेलीने २९ चेंडूत ३३ धावा केल्या. नवगिरे आणि हिली यांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करत यूपीच्या विजयाचा पाया रचला.
यानंतर ताहिला मॅकग्रा एक धाव काढून बाद झाली. ग्रेस हॅरिस आणि दीप्ती शर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ६५ धावांची भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले.
हॅरिसने १७ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या. तिने ६ चौकार आणि एक षटकार मारला. दीप्ती शर्माने २० चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने नाबाद २७ धावा केल्या. मुंबईकडून इस्सी वँगने दोन बळी घेतले. अमेलिया केरला एक विकेट मिळाला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात धमाकेदार झाली. यास्तिका भाटिया आणि हिली मॅथ्यूज यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. मुंबईकडून हिली मॅथ्यूजने अर्धशतकी खेळी खेळली. तिने ४७ चेंडूत ५५ धावा केल्या. यास्तिका भाटियाने २६ आणि अमेलिया केरने २३ धावा केल्या.
यानंतर कर्णधार नताली सीव्हर ब्रंट १९ धावा करून बाद झाली. पूजा वस्त्राकर १८ धावा करून बाद झाली. शेवटी इस्सी वाँगने ६ चेंडूंत नाबाद १५ धावा केल्या.
यूपी वॉरियर्सकडून अंजली सरवानी, ग्रेस हॅरिस, सोफी एक्लेस्टोन, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.