महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात ६ बाद १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने मुंबई इंडियन्सला ६ बाद १३० धावाच करता आल्या.
शेवटच्या चेंडूवर मुंबईला ६ धावांची गरज होती. फलंदाज अमेलिया केरने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडूवर व्यवस्थित बॅटवर बसला नाही. शेवटच्या चेंडूवर एकच धाव मिळाली आणि मुंबईने ५ धावांनी सामना गमावला.
त्याचबरोबर या विजयानंतर स्मृती मंधानाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. त्याचवेळी हा जेतेपदाचा सामना रविवारी (१७ मार्च) अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
मुंबई एकवेळ ३ बाद १२० धावा अशा मजबूत स्थितीत होती आणि सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण १७व्या षटकार हरमनप्रीत कौर षटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाली आणि इथून सामना आरसीबीच्या दिशेने फिरला.
हरमनप्रीत बाद झाल्यानंतर सजना सजीवन पुजा वस्त्राकर या लगेच बाद झाल्या. शेवटच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज होती. पुजा आणि अमेलिया केर यांना या धावा करता आल्या नाहीत.
मुंबईकडून यास्तिका भाटिया १९, हिली मॅथ्यूज १५ यांनी ४ षटकात २७ धावा करत चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर नॅट सिव्हर ब्रंटने २३ धावा केल्या. हरमनप्रीत कौर ३० चेंडूत ३३ धावा करून बाद झाली. तर अमेलिया केर २७ धावांवर नाबाद राहिली.
आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली. शेवटचे षटक एस शोभना हिने टाकले.
बंगळुरूसाठी श्रेयंका पाटील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. श्रेयंका पाटीलने २ बळी घेतले. याशिवाय एलिस पेरी, सोफी मॉलिनक्स, जॉर्जिया वेअरहम आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अष्टपैलू एलिस पेरीने सर्वाधिक धावा केल्या. एलिस पेरीने ५० चेंडूत ६६ धावांची खेळी खेळली. तिने आपल्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार लगावला. पण पेरीशिवाय कर्णधार स्मृती मानधना आणि उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. स्मृती मानधनाने ७ चेंडूत १० धावा केल्या. सोफिया डिव्हाईन आणि दिशा कासट यांनी अनुक्रमे १० आणि ० धावा केल्या. आरसीबीची सर्वात मोठी आशा रिचा घोष १९ चेंडूत १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. मात्र, जॉर्जिया वेअरहॅमने शेवटच्या षटकांमध्ये १० चेंडूत १८ धावा करत संघाची धावसंख्या १३५ धावांपर्यंत नेली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खूपच खराब झाली. या संघाचे टॉप-३ फलंदाज २३ धावात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्याचवेळी आरसीबीला ४९ धावांवर चौथा धक्का बसला. पण एलिस पेरीने मधल्या फळीतील फलंदाजांसह छोट्या-छोट्या भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
मुंबई इंडियन्सकडून हेली मॅथ्यूज, नॅट सीव्हर ब्रंट आणि सायका इशाक यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.