MI vs GT IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये आज (२९ मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या मोसमातील पहिला विजय शोधत आहेत. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यातून पुनरागमन करत आहे.
हार्दिक चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. कारण गेल्या मोसमात स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. आता कर्णधार हार्दिक पुनरागमन करणार आहे, परंतु प्रश्न असा आहे की त्याच्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधून कोणत्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल?
हार्दिक पांड्या साधारणपणे पाचव्या ते सातव्या स्थानावर फलंदाजी करतो. CSK विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनचे संयोजन पाहिल्यास, संघ व्यवस्थित दिसतो. हार्दिक पांड्या संघात आल्यास रॉबिन मिन्झ याला बाहेर बसावे लागू शकते.
मिन्झ हा यष्टिरक्षक फलंदाज आहे, पण मुंबई संघाकडे यष्टीरक्षक म्हणून रायन रिकेल्टन आधीच आहे. अशा स्थितीत गुजरातविरुद्धच्या सामन्यात रॉबिन मिंझ याला वगळण्याची दाट शक्यता आहे. CSK विरुद्धच्या सामन्यात त्याला केवळ ३ धावा करता आल्या होत्या.
आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने लज्जास्पद कामगिरी केली होती. गेल्या हंगामात, त्यांना शेवटचे दोन सामने गमवावे लागले होते, तर आयपीएल २०२५ मधील त्यांच्या मोहिमेची सुरुवात CSK विरुद्धच्या पराभवाने झाली.
आता गुजरातविरुद्धच्या सामन्यात विजयाची नोंद करून मुंबई इंडियन्सला सलग चौथा पराभव टाळायचा आहे.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, विल जॅक, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, हार्दिक पांड्या (कर्णधार), मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर.
संबंधित बातम्या