Mumbai Indians Vs Gujarat Giants WPL Scorecard : महिला प्रीमियर लीगचा १६वा सामना आज (९ मार्च) मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने शेवटच्या षटकात विजय मिळवला.
या सामन्यात गुजरातची कर्णधार बेथ मुनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुजरातने २० षटकात ७ बाद १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १९.५ षटकात १९१ धावा करत सामना जिंकला.
१९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने शानदार फलंदाजी केली. यास्तिका भाटिया (४९) आणि हेली मॅथ्यूज (१८) यांनी ६ षटकात ५० धावांची सलामी दिली.
यानंतर हरमनप्रीत कौरने ४८ चेंडूत ९५ धावांची नाबाद खेळी खेळून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने १० चौकार आणि ५ षटकार मारले.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातची सुरुवात काही विशेष झाली नाही. संघाला पहिला धक्का लॉरा वॉल्वार्डच्या रूपाने बसला. तिला केवळ १३ धावा करता आल्या. यानंतर दयालन हेमलता आणि कर्णधार बेथ मुनीने वादळी फलंदाजी केली. हेमलता आणि बेथ मुनीने शतकी भागीदारी केली. या दोघींमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ६२ चेंडूत १२१ धावांची भागीदारी झाली.
मुनीने ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या, तर दयालन हेमलताने ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४० चेंडूत ७४ धावा केल्या.
या मोसमातील तिची ही पहिली अर्धशतकी खेळी आहे. १४व्या षटकात बेथ मुनी बाद झाली. यामुळे गुजरातला २०० धावांचा टप्पा पार करता आला नाही. मुनी बाद झाल्यानंतर फोबी लिचफिल्ड ३, ऍशले गार्डनर १, कॅथरीन ब्राइस ७ धावा यांनी निराशा केली. शेवटी भारती फुलमाळीने झटपट २१ धावा करत संघाला १९० धावांपर्यंत पोहोचवले.
मुंबईकडून सायका इशाकने २ तर हेली, शबनीम, पूजा वस्त्राकार आणि सजीवन सजना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.