महिला प्रीमियर लीग २०२४ चा थरार आजपासून सुरू झाला आहे. WPL 2024 चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, नॅट सीव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), अमेलिया केर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.
त्यापूर्वी, महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान याच्यासह शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन आणि वरुण धवन यांनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
दरम्यान, पहिल्यांदाच महिला प्रीमियर लीग देशातील दोन शहरांमध्ये खेळली जाणार आहे. स्पर्धेचे ११ सामने बंगळुरूत तर ११ सामने दिल्लीत खेळले जाणार आहेत. यावेळी स्पर्धेच्या स्वरुपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्यावेळेप्रमाणे एकूण २२ सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येकी संघ इतर संघांना दोनदा भिडणार आहे. गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकाचा संघ थेट फायनलमध्ये जाईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघात एलिमिनेटरचा सामना होईल, यातील जो जिंकेल तो फायनल खेळेल.