मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs CSK : वानखेडेवर मुंबईचा पराभव, रोहित शर्माचं शतक व्यर्थ, सीएसकेच्या गोलंदाजांची जबरदस्त गोलंदाजी

MI vs CSK : वानखेडेवर मुंबईचा पराभव, रोहित शर्माचं शतक व्यर्थ, सीएसकेच्या गोलंदाजांची जबरदस्त गोलंदाजी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 14, 2024 07:28 PM IST

MI vs CSK Live Score : आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. या सामन्यात मुंबईचा २० धावांनी पराभव झाला.

MI vs CSK Indian Premier League 2024
MI vs CSK Indian Premier League 2024 (PTI)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव झाला.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. १०५ धावा करून तो नाबाद राहिला. मात्र, त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

तत्पूर्वी, सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १८६ धावाच करू शकली. रोहितने दमदार कामगिरी करत ६३ चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि ५ षटकार मारले. 

रोहितशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही. इशान किशन २३ धावा करून बाद झाला. तिलक वर्मा ३१ धावा करून बाद झाला. 

सीएसकेकडून मथिषा पाथिराणा ४ षटकात २८ धावा देत ४ बळी घेतले. तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान यांना १-१ विकेट मिळाली.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूत ६९ धावा केल्या. शिवम दुबेने नाबाद ६६ धावा केल्या. त्याने ३८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकार ठोकले.

मुंबई वि. सीएसके क्रिकेट स्कोअर

मुंबईला पाचवा धक्का

टीम डेव्हिडच्या रूपाने मुंबईला पाचवा धक्का बसला. त्याला दोन षटकारांच्या जोरावर १३ धावा करता आल्या. सध्या रोहित शर्मा आणि रोमारियो शेफर्ड क्रीजवर आहेत. संघाला विजयासाठी १८ चेंडूत ५३ धावांची गरज आहे.

मुंबईच्या पॉवरप्लेमध्ये ६३ धावा

मुंबईचा पॉवरप्ले संपला आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यात ६ षटकांत ६३ धावांची भागीदारी झाली आहे. दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. मुंबईला विजयासाठी ८३ चेंडूत १४३ धावांची गरज आहे.

सीएसकेच्या २०६ धावा

चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य दिले आहे. महेंद्रसिंग धोनी सीएसकेसाठी शेवटच्या षटकात फलंदाजीला आला. येताच त्याने ४ चेंडूत नाबाद २० धावा केल्या. त्याने हार्दिक पंड्याच्या या षटकात सलग ३ षटकार मारले.

या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी अर्धशतके झळकावली. चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीला फलंदाजीला आलेला अजिंक्य रहाणे केवळ ५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी रचिन रवींद्रलाही २१ धावा करता आल्या. यानंतर दुबे आणि गायकवाड यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी झाली, जी हार्दिक पांड्याने मोडली. त्याने सीएसकेच्या कर्णधाराला १५० धावांवर बाद केले. या सामन्यात ऋतुराजने ४० चेंडूंचा सामना करत ६९ धावा केल्या.

यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ५ षटकार आले. संघाला चौथा धक्का डॅरिल मिशेलच्या रूपाने बसला. तो १७ धावा करून माघारी परतला. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पंड्याने त्याला नबीकरवी झेलबाद केले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या धोनीने शेवटच्या ४ चेंडूत २० धावा केल्या. त्याने लागोपाठ ३ चेंडूत ३ षटकार ठोकले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट ५०० चा होता.

ऋतुराज गायकवाड बाद

हार्दिक पांड्याने चेन्नईला तिसरा धक्का दिला. त्याने रुऋतुराज गायकवाड याला बाद केले. तो ६९ धावा करून परतला. कर्णधाराने शिवम दुबेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची मोठी भागीदारी केली. डेरिल मिशेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. १६ षटकांनंतर संघाची धावसंख्या ३ बाद १५१ धावा आहे.

चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का

श्रेयस गोपालने चेन्नई सुपर किंग्जला दुसरा धक्का दिला. आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने रचिन रवींद्रला बाद केले. रचिनने २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

सीएसकेच्या पॉवरप्लेमध्ये ४८ धावा 

सीएसकेचा पॉवरप्ले संपला आहे. चेन्नईने ६ षटकात एक विकेट गमावून ४८ धावा केल्या आहेत. संघाला पहिला धक्का अजिंक्य रहाणेच्या रूपाने बसला. तो केवळ ५ धावा करू शकला. सध्या रचिन रवींद्र १२ आणि ऋतुराज गायकवाड २९ धावांवर खेळत आहेत. मोहम्मद नबी डावातील सातवे षटक टाकण्यासाठी आला आहे.

अजिंक्य रहाणे बाद

जेराल्ड कोएत्झीने चेन्नईला पहिला धक्का दिला. त्याने डावाच्या दुसऱ्याच षटकात अजिंक्य रहाणेला बळी बनवले. सलामीला आलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेला केवळ ५ धावा करता आल्या. हार्दिक पंड्याने त्याचा झेल टिपला. कर्णधार ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. दोन षटकांनंतर CSK धावसंख्या १ बाद ९ आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान. 

इम्पॅक्ट सब: मथिशा पाथिराना, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, मोईन अली, शेख रशीद.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल. 

इम्पॅक्ट उप: सूर्यकुमार यादव, डीवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई.

मुंबईने टॉस जिंकला

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी मुंबईने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर चेन्नई सुपर किंग्जने महिश तिक्षीनाच्या जागी मथिशा पाथिरानाचा समावेश आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. 

टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड आणि जेराल्ड कोएत्झी हे ४ परदेशी खेळाडू मुंबईसाठी खेळताना दिसणार आहेत. तर चेन्नईकडून रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल आणि मुस्तफिजुर रहमान हे परदेशी खेळाडू खेळतील.

IPL_Entry_Point