MI Cape Town vs Sunrisers Eastern Cape, Final : दक्षिण आफ्रिकेची टी-20 लीग SA20 चा अंतिम सामना एमआय केपटाऊन आणि सनरायझर्स इस्टर्न केप यांच्यात (८ फेब्रुवारी) खेळला गेला. या सामन्यात एमआय केपटाऊन संघाने सनरायझर्स इस्टर्न केपचा ७६ धावांनी पराभव केला.
या विजयासह एमआय केपटाऊन संघ लीगमध्ये प्रथमच चॅम्पियन बनला. अफगाणिस्तानच्या राशीद खान याने एमआय केपटाऊनचे नेतृत्व केले.
काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायझर्स इस्टर्न केप संघाने सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले होते, मात्र यावेळी त्यांना आपले विजेतेपद वाचवता आले नाही. सनरायझर्स संघ गेल्या हंगामात चॅम्पियन होता, परंतु यावेळी त्यांच्या संघाची दैना उडाली.
विशेष म्हणजे सनरायझर्स इस्टर्न केपने सलग दोनदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते, त्यांना हॅट्ट्रिक करण्याची सुवर्णसंधी होती. पण त्यांनी ती गमावली.
दरम्यान यंदाच्या अंतिम सामन्यात एमआय केपटाऊन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून १८१ धावा केल्या. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना सनरायझर्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने १० धावांतच दोन विकेट गमावल्या होत्या.
एमआयकडून कागिसो रबाडा आणि ट्रेंट बोल्ट सारख्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. त्यांनी सनरायझर्सचा संपूर्ण संघ १८.४ षटकात अवघ्या १०५ धावांवर गारद झाला. अशा प्रकारे एमआय केपटाऊनने सामना सहज जिंकला.
SA T20 लीगच्या अंतिम सामन्यात एमआयने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत वर्चस्व गाजवले. फलंदाजीत डेव्हाल्ड ब्रेव्हिसने मुंबईसाठी १८ चेंडूत ३८ धावांची खेळी खेळली. याशिवाय कॉनर एस्टरह्युझेननेही संघासाठी ३९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले तर यष्टीरक्षक फलंदाज रिकेल्टनने १५ चेंडूत ३३ धावा केल्या. अशा स्थितीत संघाने १८१ धावा केल्या.
यानंतर सनरायझर्ससमोर जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी १८२ धावांचे लक्ष्य होते. या फॉरमॅटमध्ये या लक्ष्याचा पाठलाग करणे सहज शक्य होते, परंतु सनरायझर्सच्या खेळाडूंना अंतिम फेरीचे दडपण सहन करता आले नाही. गोलंदाजीत, कागिसो रबाडाने मुंबईसाठी कमाल केली आणि ३.4 षटकात २६ धावा देत ४ बळी घेतले.
रबाडाशिवाय ट्रेंट बोल्टने ४ षटकात केवळ ९ धावा देत २ बळी घेतले, तर जॉर्ज लिंडेने २ बळी, कर्णधार राशिद खानने १ बळी आणि कॉर्बिन बॉसने १ बळी घेतला.
संबंधित बातम्या