मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२४ ची सुरुवात चांगली झाली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्सचा नेट-रन रेटही खूपच खराब आहे. परिणामी संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
दरम्यान, अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांनी हार्दिक पंड्याला प्रचंड ट्रोल केले होते. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचे कर्णधारपद काढून हार्दिक पंड्याला दिले. ही गोष्ट क्रिकेट चाहत्यांना आवडली नाही. त्यामुळे चाहते हार्दिकला सोशल मीडिया तसेच, मैदानात जाऊन ट्रोल करत आहेत.
विशेष म्हणजे, आता मुंबई इंडियन्स आपला पुढचा सामना होम ग्राऊंड मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. मुंबई १ एप्रिल रोजी वानखेडेवर राजस्थान रॉयल्सला भिडणार आहे.
पण या सामन्यापूर्वी एक अफवा पसरली आहे, ज्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पंड्याला ट्रोल करणाऱ्या चाहत्यांवर कडक कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले होते. तसेच, हार्दिकला शिविगाळ करणाऱ्या चाहत्यांना मैदानातून बाहेर काढण्यात येणार आहे, अशी माहिती सोशल मीडियवर पसरली होती. पण आता या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे.
हार्दिक पंड्याला ट्रोल करून मैदानात गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि त्यांना मैदानाबाहेरही काढले जाईल, अशी अफवा पसरली आहे. पण आता मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अफवा असून यात काहीही तथ्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.
बीसीसीआयने मैदानात प्रेक्षकांच्या वागणुकीबाबत यापूर्वीच काही सूचना दिल्या आहेत. आत्तापर्यंत आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये याच सूचनांचे पालन केले जात आहे आणि भविष्यातही त्याचे पालन केले जाईल, असे सांगण्यात आले आहे,
IPL २०२४ मधील पहिल्या सामन्यात मुंबईला गुजरात टायटन्सविरुद्ध ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर दुसऱ्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा धुव्वा उडवला. आता तिसऱ्या सामन्यात मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल, राजस्थानने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.
संबंधित बातम्या