क्रिकेट क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांचा विजय झाला आहे. अजिंक्य नाईक यांनी आशिष शेलार गटाच्या संजय नाईक यांचा पराभव केला. अजिंक्य नाईक यांच्या रुपात मुंबई क्रिकेट असोसिएशनला सर्वात युवा अध्यक्ष मिळाला आहे. दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक झाली.
वयाच्या ३८ व्या वर्षी अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले आहेत. या विजयानंतर अजिंक्य नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत हा विजय अमोल काळे यांचा असल्याचं म्हटलं आहे.
एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. यामुळे मुंबई क्रिकेट असोसिशनचं अध्यक्षपद रिक्त होतं. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिशनच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली असून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गटाकडून संजय नाईक निवडणुकीच्या मैदानात होते. तर शरद पवार गटाकडून अजिंक्य नाईक निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत आशिष शेलार गटाचे संजय नाईक यांचा पराभव झाल्यामुळे आशिष शेलार यांना धक्का बसला.
या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते भूषण पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष संजय नाईक यांच्यात थेट लढत झाली. अजिंक्य नाईक यांना २२१ मते तर संजय नाईक यांना ११४ मते मिळाली. अजिंक्य नाईक यांनी मोठा विजय मिळवत संजय नाईक यांचा १०७ मतांनी पराभव केला.
असोसिएशनच्या ३७७ मतदारांपैकी ३३५ जणांनी मतदान केले, तर ४२ मतदार अनुपस्थित होते. विजयी उमेदवार अजिंक्य नाईक हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार होते तर या निवडणुकीत महायुती पुरस्कृत असलेले उमेदवार संजय नाईक यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे.
ट्वेंटी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० जून रोजी काळे यांचे निधन झाले. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अजिंक्य नाईक म्हणाले की, मी आधीच सांगितल्याप्रमाणे ही दु:खाची निवडणूक आहे. त्यामुळे हा अमोल काळे यांचा विजय आहे. त्यांचा वारसा जपण्यासाठी मी लढलो होतो. सर्व क्लब, क्रिकेटर्स, शाळा आणि क्लब सेक्रेटरी यांचा हा विजय आहे. शरद पवारांसह इतरही पक्षातील नेत्यांचे आभार मानतो. रणजी ट्रॉफी आणि भारताच्या राष्ट्रीय संघासाठी खेळाडू पुरवणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.