Wankhede Stadium 50 Year Celebration : मुंबई क्रिकेट संघटना वानखेडे स्टेडियमचा ५० वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. यावेळी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, दिलीप वेंगसरकर आणि डायना एडुल्जी यांच्यासह मुंबईचे दिग्गज आजी माजी क्रिकेटपटू एकत्र येणार आहेत.
याशिवाय मुंबईचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज पुरुष आणि महिला खेळाडू या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. वानखेडे स्टेडियमच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला १२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर, त्याचा मुख्य कार्यक्रम १९ जानेवारीला होणार आहे.
दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की, 'आम्ही प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमचा ५० वा वर्धापन दिन साजरा करत आहोत, मी सर्व क्रिकेट चाहत्यांना या महत्त्वाच्या प्रसंगाचा भाग होण्यासाठी मनापासून आमंत्रित करतो.
नाईक पुढे म्हणाले की, आमचे दिग्गज हिरो आमच्या या उत्सवात सामील होतील आणि आम्ही एकत्रितपणे मुंबईची शान असलेल्या वानखेडे स्टेडियमच्या समृद्ध वारशाला आदरांजली वाहणार आहोत. चला हा उत्सव खरोखरच अविस्मरणीय बनवूया. वानखेडे स्टेडियमच्या प्रतिष्ठित वारशाचा सन्मान करण्यासाठी एक स्मृती टपाल तिकीट देखील जारी केले जाईल.
सोबतच या खास सोहळ्यात मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने ग्राउंड्समनचाही सन्मान करण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी पॉली उमरीगर आरोग्य शिबिर व विशेष भोजनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या सगळ्यानंतर वानखेडे स्टेडियमवर १९७४ मध्ये पहिला प्रथम श्रेणी सामना खेळलेल्या मुंबई संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जर तुम्हाला या कार्यक्रमाची तिकिटे मिळवायची असतील तर तुम्हाला Zomato आणि Insider.in द्वारे मिळवू शकता. येथून तुम्ही ऑनलाइन तिकिटे खरेदी करू शकता.
संबंधित बातम्या