भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (२४ ऑक्टोबर) पुण्यात खेळला जात आहे. पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या स्टेडियमवर अत्यावश्यक सुविधाही नसल्याचे समोर आले आहे. इनसाइड स्पोर्ट्सच्या माहितीनुसार, पुण्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीच्या पहिल्या दिवशी चाहत्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तरसावे लागले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने चाहत्यांना मोफत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र स्टेडियममध्ये पाण्याची कमतरता होती. यानंतर परिस्थिती चिघळत राहिली. सोशल मीडिया आणि इतर मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाण्याअभावी जवळपास २० क्रिकेट चाहत्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आपली चूक मान्य केली आहे. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पुरेशा प्रमाणात पाणी दिले जाईल, असे आश्वासन दिले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाण्याअभावी परिस्थिती इतकी बिकट झाली होती की सुमारे २० लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्याचवेळी आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे वक्तव्य आले आहे. ही आमची चूक होती, असे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे म्हणणे आहे, पण आता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाण्याची पुरेशी व्यवस्था केली जाईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या १ विकेटवर १६ धावा होती. भारतीय कर्णधार रोहित शर्मा शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल नाबाद परतले. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या किवी संघाने सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सलामीवीर ड्वेन कॉनवेने सर्वाधिक ७६ धावा केल्या. याशिवाय रचिन रवींद्रने ६५ धावांचे योगदान दिले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ७ विकेट घेतल्या. तर रवी अश्विनने ३ फलंदाजांना बाद केले.
संबंधित बातम्या