भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची पत्रकार परिषद झाली. आज मंगळवारी झालेल्या या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने आपल्या वक्तव्याने विरोधी संघाला इशारा दिला आहे.
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की, चेन्नईमध्ये आमचा सराव चांगला होता, आम्ही बरेच तास सराव केला. काही खेळाडू दुलीप ट्रॉफी खेळत आहेत, त्यामुळे ते आधीच तयार आहेत आणि मला वाटते की आम्ही मालिकेसाठी पूर्णपणे तयार आहोत.
सोबतच, रोहितने या पत्रकार परिषदेतील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर बांगलादेश संघाकडून भारताला धोका असेल का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
तसेच, बांगलादेशी कर्णधार नझमुल हुसैन शांतो याने या मालिकेत भारताचा पराभव होईल, असे वक्तव्य केले होते. आता रोहितने या वक्तव्यालाही चोख प्रत्युत्तर दिले आहे.
'हिटमॅन' म्हणाला की, प्रत्येक संघाला भारताला हरवण्याचा आनंद मिळतो, पण आम्हाला त्याची पर्वा नाही. यंदाच्या इंग्लंड मालिकेतही हे दिसून आले, पण आम्हाला आमचे लक्ष्य माहित आहे.
इंग्लंडची टीम भारतात आली तेव्हा त्यांनीही अशी बरीच विधाने केली होती, पण आम्ही त्या गोष्टीवर फारसे लक्ष केंद्रित केले नाही. निकाल आमच्या बाजूने कसे आणायचे हे आम्हाला चांगले माहित आहे'.
पत्रकार परिषदेत कर्णधार रोहितला केएल राहुलला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळण्याबाबत विचारण्यात आले. यावर रोहित म्हणाला की, केएलला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. त्याला या फॉरमॅटमध्ये यश मिळू शकत नाही याचे कोणतेही कारण मला दिसत नाही.
रोहितने ही मालिका डब्ल्यूटीसी फायनलसारखी महत्त्वाची असल्याचे सांगितले. तो म्हणाला की जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत असता, तेव्हा प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वीची ही रिहर्सल नाही.