टीम इंडियाचा क्रिकेटपटू मयंक अग्रवालची प्रकृती आज (३० जानेवारी) अचानक बिघडली होती. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता त्याच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, मयंक अग्रवाल याची प्रकृती आता ठीक असून त्याला उद्या म्हणजेच बुधवारी (३१ जानेवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यानंतर तो बेंगळुरूला रवाना होईल.
मयंक अग्रवाल सध्या रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघाचे नेतृत्व करत आहे. अशा स्थितीत तो दिल्लीविरुद्धचा सामना खेळणे कठीण आहे.
कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल याची विमानात प्रवास करत असताना अचानक प्रकृती बिघडली होती. यानंतर त्याला आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयंक मंगळवारी टीमसोबत दिल्लीला निघाला होता. मात्र, विमानात चढल्यानंतर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याच्या घशात जळजळ होत असल्याची तक्रार त्याने केली होती. यानंतर मयंकला उलट्या होऊ लागल्या होत्या. अशा स्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कर्नाटकचा कर्णधार रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. गुजरातविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने १०९ धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर गोव्याविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मयंकने ११४ धावा केल्या. यानंतर त्रिपुराविरुद्धच्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले होते.
मयंकने भारतासाठी आतापर्यंत २१ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या ३६ डावांमध्ये त्याने ४१.३३ च्या सरासरीने १४८८ धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने ४ शतके आणि ६ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २४३ धावा आहे.
याशिवाय मयंकने एकदिवसीय सामन्यांच्या ५ डावात ८६ धावा केल्या. या काळात मयंकला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. मयंकने डिसेंबर २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.