पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून (२१ ऑगस्ट) रावळपिंडीत खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि ३ गडी लवकर गमावले. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामने पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद (६) आणि स्टार फलंदाज बाबर आझम शुन्यावर बाद करून पाकिस्तानला सुरुवातीचा धक्का दिला.
पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद अंपायरच्या निर्णयावर चांगलाच संतापलेला दिसत होता. सातव्या षटकात मसूद विकेटच्या मागे झेलबाद झाला. बाद झाल्यानंतर मसूद पंचांशी वाद घालताना दिसला आणि तो यावेळी चांगलाच संतापलेला दिसत होता.
शरीफुलच्या चेंडूवर मसूदने मिड-ऑफच्या दिशेने बचावात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. तो बीट झाला आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला, खेळाडूंनी अपील केले, पण मैदानावरील पंचांनी मसूदला नाबाद घोषित केले.
चेंडू बॅटची कड यष्टीरक्षकाकडे गेल्याचा विश्वास बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेनला होता. यामुळे त्याने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. अल्ट्रा-एज तंत्रज्ञानामुळे चेंडू बॅटला लागल्याचे उघड झाले आणि पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.
थर्ड अंपायरच्या या निर्णयाने शान मसूद संतापला. तो म्हणाला की चेंडू पॅडला लागला होता. जेव्हा चेंडू त्याच्या जवळून गेला तेव्हा त्याच वेळी पॅडही मध्ये होता. रिप्लेमध्ये चेंडू पॅडला लागल्यासारखे वाटत होते. यानंतरही तिसऱ्या पंचाने फलंदाजाला बाद घोषित केले. यामुळे शान मसूद संतप्त तंबूत परतला.
पाकिस्तानच्या सुरुवातीच्या ३ विकेट १६ धावांवर पडल्या होत्या. यानंतर सॅम अयुब आणि सौद शकीलने डावाची धुरा सांभाळली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ९८ धावांची भागीदारी झाली. अयुब ५६ धावा करून बाद झाला. यानंतर मोहम्मद रिझवान क्रीजवर आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानची धावसंख्या ४ विकेटवर १५८ धावा आहे. शकील ५७ आणि रिझवान २४ धावांवर नाबाद परतले आहे.